सामाजिक

तत्वनिष्ठ बीटी भाऊ देशमुख…विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेश बोलवायला लावणारा आमदार !!

img 20260620 wa0624

पंचनामा विशेष – महाराष्ट्राच्या विधिमंडळात अभ्यासू आणि तत्त्वनिष्ठ आमदार म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ते प्रा. बी. टी. देशमुख म्हणजेच बी. टी. भाऊ. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले.

विधिमंडळ वृत्तांकन करताना बीटी भाऊ यांच्याबद्दल मला विशेष आकर्षण होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे कृष्णा खोरे पाणी तंटा लवाद आणि विदर्भ अनुशेषामुळे कृष्णा खोऱ्यातील सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध होत नसल्याने सभागृहात होत असलेला पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यामधील वाद.

बीटी भाऊ सर्व प्रकारचे कायदेशीर दाखले, विविध समित्या आणि लवादा संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील निर्णयावर अभ्यासपूर्ण भाषण आणि प्रभावी मांडणी करायचे. कृष्णा खोरे विषयाबद्दल माझी अभ्यास वृत्ती असल्याने मी त्यांचे भाषण कधी चुकवले नाही. त्यांच्या भाषणासाठी विधानसभेच्या वार्ताहर गॅलरी मधून मी विधान परिषदेच्या वार्ताहर गॅलरी जाऊन बसत असे. कामकाजातून बीटी भाऊ सभागृहाबाहेर बाहेर आले की या मुद्द्यांवर जाऊन त्यांच्याशी चर्चा करत असे. त्यामुळे त्यांचा परिचय वाढत गेला.

विठ्ठल जाधव हे पुण्याचे. ते कृष्णा खोरे समर्थक आहेत असे बीटी भाऊ आवर्जून अन्य पत्रकार मित्रांना सांगायचे.विदर्भातील काही पत्रकार मित्रांच्या बरोबरीने त्यांच्याशी पुढील काळात नेहमी संवाद राहिला. विधानभवनातल्या तिसऱ्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये बसून त्यांच्याशी पत्रकारांच्या गप्पा व्हायच्या.

ज्या ज्या वेळी विधेयक, अर्थसंकल्प, किंवा सभागृहातील कामकाजाच्या संदर्भात अकॅडमीक मुद्दे उपस्थित करून आपल्या अभ्यासपूर्ण भाषण आणि मुद्द्यांवर सरकारची कोंडी करताना आपला मुद्दा कसा रास्त आहे. याची प्रभावी मांडणी करण्यामध्ये बेटी भाऊंचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता.

महाराष्ट्र विधिमंडळातील एक ऐतिहासिक प्रसंग त्यांच्यामुळे घडला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. संसदीय कामकाज मंत्र्यांची जबाबदारी डॉ. पतंगराव कदम यांच्यावर होती. विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. पुरवणी मागण्यांवरील विनियोजन विधेयक विधानसभेत मंजूर झाले. त्यानंतर तात्काळ हे विधेयक विधान परिषदेमध्ये मंजुरीसाठी पाठवण्यात आले. विनियोजन विधेयक मंजूर झाल्याने विधानसभेचे सभागृह संस्थगित करण्याचा निर्णय झाला. जनगणमन राष्ट्रगीत होऊन विधानसभेचे अधिवेशन संपले. मात्र याचवेळी विधान परिषदेचे कामकाज सुरू होते. विधानसभेने संमत केलेल्या विनीयोजन विधेयकावर चर्चा सुरू झाली. अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेतही हे विधेयक मंजूर होईल अशी धारणा सरकारची होती. मात्र अनेक तांत्रिक मुद्दे बी टी भाऊ यांनी विनियोजन विधेयकावर उपस्थित केले. घमासान चर्चा विधान परिषदेत झाली.विधिमंडळ कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बेटी भाऊंनी याचवेळी यावेळी विनियोजन विधेयकाला एक उपसूचना दिली. नितीन गडकरी, दिवाकर रावते यांच्यासह सर्व विरोधकांनी उपसूचनेला पाठिंबा दिला. आणि ही उपसूचना विधान परिषदेमध्ये मंजूर झाली.

दुरुस्तीसह हे विनियोजन विधेयक पुन्हा विधानसभेकडे पाठवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मोठा बाका प्रसंग सत्ताधारी आणि विधिमंडळ प्रशासनापुढे उभा राहिला. विधानसभेचे सभागृह तर संस्थगित झाले होते. विधिमंडळ प्रशासनाची धावपळ झाली. पुन्हा फोना फोन सुरू केली तर काही मंत्री अगदी खंडाळा घाटापर्यंत पोहोचले होते. सर्व इलाज थांबले. अखेर काही दिवसांनी विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे लागले. आणि त्या उपसूचनेवर निर्णय करावा लागला. त्यानंतर पुरवणी मागण्या मंजूर झाल्या या सगळ्याचे कारण होते बीटी भाऊ…

विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, आकडेवारीसह मांडलेले मुद्दे आणि विदर्भाच्या सिंचन, पाणी, रस्ते व भौतिक अनुशेषाबाबतचा सातत्यपूर्ण पाठपुरावा नेहमीच मार्गदर्शक ठरला. विधिमंडळाच्या कामकाजाची शिस्त, विषयांचा सखोल अभ्यास,विदर्भाच्या विकासासाठी लढणारा आमदार नेता म्हणून उभ्या महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणारे, अभ्यासू, तत्त्वनिष्ठ राजकारणी असलेले प्रा. बीटी भाऊ देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

विठ्ठल जाधव (उपसंपादक दैनिक सामना)

1009828025
1009828034
1009881998
1009877982

Related posts

अन्यायकारक संचमान्यता निकषांविरोधात पुण्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन !!

Chief Editor

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेच्या मागणीची एसटी प्रशासनाकडून दखल !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेची इयत्ता दहावीच्या यशाची परंपरा कायम !!

Chief Editor

Leave a Comment