सामाजिक

समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे येथे ‘नशामुक्त युवा अभियान’ उत्साहात संपन्न !!

1010446798

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे येथे भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘नशामुक्त युवा अभियान’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून निरोगी, सुदृढ व जबाबदार नागरिक घडविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी सुमन व्यसनमुक्ती व मानसिक आजार उपचार केंद्र, आळेफाटा येथील समुपदेशक प्रज्ञा प्रशांत सोमन, जनसंपर्क अधिकारी ऋषी साबळे, आळेफाटा पोलीस ठाणे येथील महिला पोलीस हवालदार ज्योती दहिफळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन बोंबे, महिला पोलीस कॉन्स्टेबल कांचन रानडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शरद पारखे यांनी प्रास्ताविक करत नशामुक्त भारत अभियानाची उद्दिष्टे, युवकांची सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.सोमनाथ गाडेकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना नशामुक्तीची शपथ देऊन कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचा तसेच इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करण्याचा संकल्प करून घेतला.

यावेळी प्रमुख पाहुण्या प्रज्ञा प्रशांत सोमन यांनी व्यसनाधीनतेची कारणे, त्याचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थीदशेत योग्य मित्रपरिवार, सकारात्मक विचार, वेळेचे नियोजन आणि चांगले छंद जोपासल्यास व्यसनापासून दूर राहता येते, असे त्यांनी सांगितले. मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी गरज भासल्यास समुपदेशन घेण्याचे आवाहन केले.

1010446794

जनसंपर्क अधिकारी ऋषी साबळे यांनी सुमन व्यसनमुक्ती व मानसिक आजार उपचार केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व्यसन ही व्यक्ती, कुटुंब आणि समाजासाठी गंभीर समस्या असून युवकांनी स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांनाही या अभियानात सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

महिला पोलीस हवालदार ज्योती दहिफळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी न जाता कायद्याचे पालन करणारे, जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक बनणे ही काळाची गरज आहे. व्यसनामुळे अनेक गुन्हे घडतात, कौटुंबिक कलह वाढतो आणि समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः व्यसनापासून दूर राहून आपल्या मित्रपरिवारालाही नशामुक्त जीवनाचा संदेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस कॉन्स्टेबल सचिन बोंबे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा प्रभाव किंवा मित्रांच्या दबावामुळे कोणत्याही प्रकारच्या व्यसनाची सुरुवात करू नये, असा सल्ला दिला. व्यसनामुळे शैक्षणिक प्रगती, करिअर आणि कुटुंबाचे मोठे नुकसान होते. युवकांनी आपली ऊर्जा शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्माणासाठी वापरावी. प्रत्येक विद्यार्थ्याने नशामुक्तीचा दूत बनून समाजात जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. उत्तम शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षणाबरोबरच चारित्र्य, शिस्त आणि उत्तम संस्कार हीच विद्यार्थ्यांची खरी ओळख आहे. कोणत्याही प्रकारचे व्यसन व्यक्तीचे आरोग्य, शिक्षण, करिअर आणि कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजासाठी आदर्श निर्माण करावा. अशा जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास निश्चितच मदत होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. गणेश बोरचटे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा .ऋषिकेश कुऱ्हाडे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारत घडविण्याचा निर्धार व्यक्त करत व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली, मानसिक आरोग्य, सामाजिक जबाबदारी आणि कायद्याबद्दलची जागरूकता निर्माण होऊन संपूर्ण परिसरात नशामुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचला.

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील घोड नदीवरील पुलाचे कठडे तुटल्याने वाहतूक धोक्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाने कठड्यांची दुरुस्ती करावी !!

Chief Editor

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी;अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी !!

Chief Editor

पंचनामा विचारधन – कन्यादान

Chief Editor

Leave a Comment