
पंचनामा विशेष – तरस हा आपल्या परिसंस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त प्राणी असून त्याला “निसर्गाचा स्वच्छतादूत” असेही म्हटले जाते. परिसरातील सडलेले मांस, मृत प्राणी यांचे सेवन करून तो पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि अप्रत्यक्षपणे मानवाचेही संरक्षण करतो.
आपल्या भारतात आढळणारा तरस हा पट्टेरी तरस (Striped Hyena) म्हणून ओळखला जातो. शरीरावर पट्टे असल्यामुळे काही वेळा लोक त्याला वाघ समजून घाबरतात. प्रत्यक्षात दिसायला थोडा वेगळा (विद्रूप) वाटला तरी तो अत्यंत उपयुक्त आणि निरुपद्रवी प्राणी आहे.

तरसाचे प्रजनन साधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारी (भाद्रपद ते मार्गशीर्ष) दरम्यान होते. मादी एका वेळी ३ ते ५ पिल्लांना जन्म देते. पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी नर आणि मादी दोघे मिळून जमिनीत खोल बिळ तयार करतात. या बिळाला ३ ते ६ प्रवेशद्वार असतात, जे आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडतात. विशेष म्हणजे, मागील वर्षीची मोठी झालेली पिल्लेसुद्धा या कामात मदत करतात.

तरस हे आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहणारे प्राणी आहेत.गवताळ माळराने, लहान टेकड्या आणि दगडी परिसर हे त्यांचे नैसर्गिक अधिवास आहेत. मात्र रस्त्यांचे रुंदीकरण, वाढते शहरीकरण आणि जलद विकास यामुळे त्यांची वस्तीस्थाने झपाट्याने कमी होत आहेत.
बदलत्या परिस्थितीत तरसांनीही आपली जीवनशैली बदलत ऊसाच्या शेतीसारख्या भागांमध्ये नवीन अधिवास निर्माण केले आहेत, त्यामुळे ते मानवी वस्तीच्या जवळ दिसू लागले आहेत.

तरस हा निशाचर (रात्री सक्रिय) प्राणी असल्यामुळे त्याचा माणसांशी थेट संपर्क कमी येतो. परंतु माहितीअभावी लोक त्याला बिबट्या समजून घाबरतात आणि गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे या प्राण्याबद्दल योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.
याच उद्देशाने आमच्या संस्थेमार्फत जनजागृतीचे उपक्रम राबवले जात आहेत, ज्यामध्ये छायाचित्रे आणि माहितीच्या माध्यमातून लोकांना या प्राण्याची ओळख करून दिली जाते. आपणास ही माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी.
अधिक माहितीसाठी संपर्क:
नचिकेत अवधानी (वन्यजीव अभ्यासक) ,दौंड
📞 9765458587
