
लोणी-धामणी : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन खंडू गणभाऊ भोजने यांची आंबेगाव तालुका देखरेख संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे जारकरवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
खंडू भोजने हे गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. जारकरवाडी विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. तसेच आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे संचालक म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.
सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, काम करण्याची तळमळ, कार्यतत्परता आणि गावाच्या विकासकामांमध्ये असलेला सक्रिय सहभाग यामुळे त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर बिनविरोध निवड झाल्याचे मानले जात आहे.
त्यांच्या निवडीमुळे जारकरवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी भोजने यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सहकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.




