काठापूर बुद्रुक येथे भक्तिमय वातावरण ; ६ नोव्हेंबरपर्यंत कथा सप्ताहाचे आयोजन !!

पंचनामा प्रतिनिधी : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भोकरवाडी गणेशनगर परिसरात सुरू असलेल्या शिवपुराण संगीतमय कथा सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कथा श्रवणासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ह.भ.प. ज्ञानेश महाराज फलके (आमोंडी) यांच्या रसाळ वाणीतून शिवपुराण कथेचे निरूपण केले जात असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
काठापूर बुद्रुक येथील भोकरवाडी गणेशनगरमध्ये दरवर्षी संगीतमय कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही परंपरा कायम राखत ह.भ.प. ज्ञानेश महाराज फलके (आमोंडी) यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झालेला हा कथा सप्ताह शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
या कथा सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी काठापूर, पोंदेवाडी, जारकरवाडी, पारगाव यांसह परिसरातील गावांमधील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. दररोज सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत संगीतमय शिवपुराण कथेचे निरूपण केले जाते. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

या सोहळ्याला भर्तुहरी विधाटे, संतोष सुंबे, हनुमान मिटकर व गणेश विधाटे यांची संगीत साथ लाभत आहे. तसेच पिरसाहेब ढोल-लेझीम मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण सप्ताहाचे नियोजन व व्यवस्थापन केले जात आहे.
असे संपन्न होतात दैनंदिन धार्मिक कार्यक्रम !!
सप्ताहादरम्यान पहाटे चार ते सहा काकडा, सकाळी सात ते दहा पारायण, दुपारी तीन ते चार नेमाचे भजन, सायंकाळी चार ते पाच हरिपाठ, सायंकाळी सहा ते रात्री नऊ संगीतमय शिवपुराण कथा आणि रात्री नऊ ते दहा महाप्रसाद, अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवपुराण कथेच्या माध्यमातून भाविकांना धार्मिक विचार, संस्कार आणि भक्तीचा संदेश मिळत असून, परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागामुळे भोकरवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.




