सामाजिक

पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे सज्ज नियोजन ; टंचाई निवारणासाठी ६५ टँकरचा आराखडा; आवश्यक निधी कमी पडू देणार नाही – दिलीपराव वळसे-पाटील

1011588805
1011588805

घोडेगाव (ता. आंबेगाव) : आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे. मा. गृहमंत्री तथा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव वळसे-पाटील यांच्या पुढाकारातून घोडेगाव येथील पंचायत समिती सभागृहात पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत १ ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य टंचाईचा सविस्तर आढावा घेऊन वर्षभरासाठी सर्वसमावेशक नियोजन आराखडा तयार करण्यात आला. टंचाई निवारणासाठी आवश्यक निधी व मदत कमी पडू दिली जाणार नाही, असा विश्वास आमदार दिलीपराव वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन विहिरींचे अधिग्रहण, बोअरवेल व विहिरींची दुरुस्ती, नवीन विंधन विहिरींची खोदाई तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ६५ टँकरची आवश्यकता असल्याची नोंद आराखड्यात करण्यात आली आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी आवश्यक खते व बियाणे तातडीने उपलब्ध करून देणे, तसेच उपलब्ध जलस्रोत बळकट करण्याच्या उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या बैठकीला जुन्नर-आंबेगावच्या उपविभागीय अधिकारी सौ. अर्चना तांबे, शिरूर-हवेलीचे उपविभागीय अधिकारी श्री. सुनील जोशी, आंबेगावचे तहसीलदार श्री. राहुल सारंग, शिरूरचे तहसीलदार श्री. बाळासाहेब म्हस्के, पंचायत समिती सभापती श्री. कैलासबुवा काळे, उपसभापती सौ. ज्योती पारधी, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अमोल मांडवे, गटविकास अधिकारी सौ. प्रमिला वाळुंज, शिरूरचे गटविकास अधिकारी श्री. महेश डोके, समाजकल्याणचे माजी सभापती श्री. सुभाष मोरमारे, श्री. प्रकाश घोलप तसेच पंचायत समितीचे इतर सन्माननीय सदस्य आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संभाव्य पाणी व चारा टंचाईचे संकट निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाच्या विविध विभागांना सोबत घेऊन नियोजनबद्ध उपाययोजना आखण्यात आल्याने टंचाईच्या काळात नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

Related posts

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) गावाने महिलांसाठी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम!!

Chief Editor

निरगुडसर मंडळ कार्यक्षेत्रात कृषी अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा !!

Chief Editor

Leave a Comment