निरगुडसर विद्यालयातील गणरायाला भावपूर्ण निरोप ; जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यासह प्रदीप व पूर्वा वळसे पाटील यांनी घेतला विद्यार्थ्यांसोबत लेझीम खेळण्याचा आनंद !!

पंचनामा प्रतिनिधी निरगुडसर – येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे सहाव्या दिवशी, शनिवार (दि. १९) रोजी ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सादर केलेल्या विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीची रंगत वाढविली.
विद्यार्थी उत्साहाने लेझीम खेळत असताना पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विवेक वळसे पाटील यांनाही लेझीम खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी त्यांचे बंधू प्रदीप वळसे पाटील व बहीण पूर्वा वळसे पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. या उत्स्फूर्त सहभागाला उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
विद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून गणरायाच्या प्रतिष्ठापनेची परंपरा आहे. सहा दिवस विद्यालयात भक्तिमय वातावरणात गणेशाची आरती, पूजा व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सहाव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात गावातून गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषाने परिसर दणाणून सोडला.
मिरवणुकीत विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील अनेक घरगुती गणपतींचेही याच दिवशी विसर्जन करण्यात आले. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी मा.सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते प्रतापराव वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, शरद पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद वळसे पाटील, संस्थेचे सचिव प्रकाश तापकीर, संचालक सुनील वळसे पाटील, श्रीकांत पवार, प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

निरगुडसर येथील विद्यालयातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांसोबत विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील व पूर्वा वळसे पाटील यांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेतला.
