सामाजिक

धामणी येथे ९ नोव्हेंबरला पारंपरिक सोमवती शाहीस्नान सोहळा ; खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी !!

1011599219
1011599219

पंचनामा प्रतिनिधी मंचर : आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानात सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी पारंपरिक सोमवती शाहीस्नान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची धामणी ग्रामस्थ आणि सेवेकरी मंडळींकडून जोरदार तयारी सुरू असून, पुणे, नगर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, भोसरी तसेच मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

दीपावलीच्या कालावधीत येणाऱ्या सोमवती अमावस्येला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून, या दिवशी भगवान महादेव व पार्वतीचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडेराय व म्हाळसाई यांची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ होणार असून, सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत अमावस्येचा कालावधी आहे. त्यामुळे सोमवती अमावस्येचा उपवास सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजीच केला जाणार असल्याचे आळंदी येथील वेदाचार्य मरकळे गुरुजी यांनी सांगितले.

सोमवारी पहाटे ५ वाजता धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात मानाच्या काठीचे मानकरी आणि सोमवतीचे परंपरागत मानकरी यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक व आरती होणार आहे.

या धार्मिक विधीमध्ये नरके मंडळी (तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), राजगुरू मंडळी (अवसरी खुर्द, ता. आंबेगाव), पंचरास मंडळी (संविदणे व धामणी), कांदळकर मंडळी (कवठे, ता. शिरूर), गावडे मंडळी (वाघाळे, ता. शिरूर), आवटे व पडवळ मंडळी (महाळुंगे, ता. आंबेगाव), वाळुंज मंडळी (खडकवाडी, लोणी), भूमकर मंडळी (राऊतवाडी, ता. शिरूर) तसेच मेंगडे मंडळी (मेंगडेवाडी, ता. आंबेगाव) यांचा सहभाग असणार आहे.

त्यानंतर सकाळी ७ वाजता मंदिरातून पंचधातूच्या श्री खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या सर्वांगसुंदर व लोभस मुखवट्यांची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवमळ्यातील विहिरीवरील सोमवती स्थानाकडे नेण्यात येणार आहे. तेथे सोमवतीच्या ओट्यावर मानकरी व भाविकांच्या हस्ते देवाच्या मुखवट्यांना शाहीस्नान घालण्यात येईल. त्यानंतर सेवेकरी मंडळींची पारंपरिक पूजा व आरती होणार आहे. पुढे पालखीची वाजतगाजत शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे.

श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आणि सोमवती शाहीस्नान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सन २०२६ मधील दुसरी व वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या दीपावलीच्या कालावधीत येत असल्याने देवकार्य, तळीभंडार आणि दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरवरच्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. धामणी ग्रामस्थांनी या पारंपरिक धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जय्यत तयारी केली आहे.

1011523562

Related posts

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी; सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान!!

Chief Editor

शेवभाजी…..!!

Chief Editor

Leave a Comment