
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बेल्हे येथे दीपावलीच्या निमित्ताने समर्थ शैक्षणिक संकुलात आयोजित दीपावली स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्नेह, सद्भावना, सांस्कृतिक मूल्ये आणि संस्थात्मक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या मेळाव्यामुळे संकुलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. बळवंत महाराज आवटे (खजिनदार, श्री वारकरी प्रबोधन महासमिती, महाराष्ट्र तथा सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी, एम.टी.एन.एल., मुंबई) उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांच्यासह संकुलातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.
दीपावलीच्या निमित्ताने समर्थ शैक्षणिक संकुलात यंदा आरोग्य, वाचन संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने पारंपरिक आयुर्वेदिक संकल्पनेतून 'अभ्यंग उत्सव किट' तयार करण्यात आले होते. या उपक्रमाला संकुलातील सर्व विभागांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय परंपरा आणि आरोग्यविषयक जागरूकता यांची सांगड घालणारा हा उपक्रम विशेष ठरला.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला 'बौद्धिक दिवाळी फराळ' हा उपक्रमही लक्षवेधी ठरला. याअंतर्गत विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी विविध विषयांवरील ४० हून अधिक दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक प्रश्न आणि वैचारिक लेखनाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन विचारशक्ती व बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
याचबरोबर दीपावलीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संकुलातील सर्व महाविद्यालयांमधील कर्मचारीवृंदासाठी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे संस्थेतील सर्व घटकांमध्ये स्नेह, आपुलकी आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली.
यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी उपस्थित सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असून सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून संस्थेची वाटचाल अधिक सक्षम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा स्नेहमेळाव्यांमुळे परस्परांमधील सुसंवाद वाढून संस्थात्मक कार्यसंस्कृती अधिक बळकट होते, असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे ह.भ.प. बळवंत महाराज आवटे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि वैचारिक अधिष्ठान लाभले. शिक्षणाबरोबरच संस्कार, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व या मेळाव्याच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके यांनीही सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे नियोजन प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी केले.


