Uncategorized

आमचे तात्या…विठ्ठल विष्णू सिनलकर

1010505226
1010505226

शब्दांकन – श्री.नवनीत रामकृष्ण सिनलकर

आमचे तात्या….
धोतर, पांढरा नेहरू शर्ट आणि डोक्यावरची पांढरी टोपी. हाच त्यांचा नेहमीचा वेश. स्वच्छ आणि साधा.
नाव होतं विठ्ठल विष्णू सिनलकर. पण आम्ही त्यांना हाक मारायचो ती एकाच नावाने… “तात्या”.
त्यांचा परिवार मोठा होता. दोन मुले, सुना, तीन मुली. सोबतीला दोन सहचारिणी. फुलाबाई आणि अवंतिका.
फुलाबाई तीन-चार वर्षांपूर्वी देवाघरी गेल्या. फुलाबाई होत्या तोपर्यंत तात्या बिनधास्त होते त्या गेल्यानंतर तात्यांनी अंथरूनच धरलं बऱ्यापैकी आजारी झाले त्यानंतर अवंतिका बाईंनी तात्यांची सावलीसारखी काळजी घेतली. आणि सुना व मुलेही येऊन जाऊन आपापल्या परीने वडिलांची सेवा करत राहिली.
तात्यांची शाळा फक्त सातवीपर्यंत.
पण आयुष्याचं खरं विद्यापीठ त्यांनी बांधावर, नांगराच्या फाळावर आणि माणसांच्या सहवासात पूर्ण केलं होतं.

त्यांच्यासाठी शेती म्हणजे पोट भरण्याचं साधन नव्हतं.
ती पूजा होती.

सुरुवातीला घरात कधी पैसा नसायचा. दिवस हालाखीचे होते. तरी तात्या कधीच खचले नाहीत.
पेरणी जवळ आली की त्यांची झोप उडायची. सकाळी उठून ते थेट रामकृष्ण दादांच्या घरी जायचे.

“दादा, यंदा काय पेरू? बटाटा लावू का कांदा? बाजरी, ज्वारी कशी करू? कोणतं बियाणं घेऊ? धना-मेथी टाकू का?”
रामकृष्ण दादांचा सल्ला मळ्यातील सर्वजण ऐकत होते तसेच गावातील लोकही सल्ला घेण्यासाठी दादांकडे येत असत.
दादा जे सांगतील ते तात्यांसाठी वेदवाक्य. गवार असो, मिरची-वांगी असो, की घास टाकायचा असो… दादांचा शब्द आणि तात्यांचे हात. एकत्र आले की मातीही हिरवी व्हायची.

मुंबई-पुण्याहून आलेला अनोळखी माणूस जरी असला, तरी त्याला पोटच्या मुलासारखं विचारायचे.
“कसं काय चाललंय ? मुलं-बाळं कशी आहेत? जेवला का?” ही चौकशी केल्याशिवाय तात्यांना चैनच पडत नसे.
सावता मळ्याचे वैभव असलेले सावता माळी मंदिरासाठी रामकृष्ण दादांनी जेव्हा फंडाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा तात्या सगळ्यात पुढे होते.
खिशात पैसे नसले तरी चालतील, पण दोन हात आहेत ना… ते मंदिरासाठी द्यायचे.
देऊळ बांधताना फंड जमवण्यापासून ते शेवटच्या रंगरंगोटीपर्यंत, जीर्णोद्धारापर्यंत तात्या प्रत्येक कामात होते. मदत करत होते
स्व.शिवराम वायाळ हे त्यांचे खास मित्र. दोघांमध्ये शब्द कमी पडले तरी चालतील, पण डोळ्यातलं सगळं एकमेकांना कळायचं.
स्वभाव शांत होता. पण समोर अन्याय दिसला की आतला विठ्ठल जागा व्हायचा.
आता वयोमानानुसार
वय ८२-८३ झालं. शरीराने साथ सोडली. अंथरुणावर पडले तात्या. डोळ्यात पाणी आणि हातात अशक्तपणा. पडल्यामुळे चालता येत नव्हते
त्याच आठवड्यात पंढरपूर गजबजलं होतं. दिंड्या निघाल्या होत्या. वारकरी आनंदाने निघाले होते टाळ-मृदंगाचा आवाज येत होता.
आणि माझा भाऊ… नाही, माझा मित्र रघुनाथ.
गेली २५ वर्षे ज्याने एकही वारी चुकवली नव्हती तो.

मी त्याला विचारलं, “वारीला नाही जाणार का?”
तो हसला. डोळे पाणावले होते. म्हणाला,
“भावा, २५ वर्षे मी पंढरीच्या विठ्ठलाला शोधत होतो. आज मला माझा विठ्ठल घरात सापडला आहे.”

पुढचे आठ दिवस रघुनाथ स्वतः विठ्ठलच बनला.
बापाला हात देऊन आंघोळ घातली.
मळके कपडे स्वतःच्या हाताने धुतले.
अंथरुणाची चादर बदलली. खोली डेटॉलने स्वच्छ केली.
डॉक्टरांकडे जाऊन औषधं आणली आणि वेळच्या वेळी दिली.

त्या आठ दिवसात मला एक गोष्ट कळली.
जसे रामकृष्ण दादा तात्यांसाठी आधार होते, तसाच रघुनाथ आज तात्यांसाठी आधार बनला होता.

तात्या, तुम्ही काय देऊन गेलात?

तुम्ही आम्हाला मोठा बंगला दिला नाही. गाडी दिली नाही. बँकेत पैसे ठेवले नाहीत.
तुम्ही आम्हाला माणुसकी दिली.

तुम्ही सांगितलं, “पोरा, गरीब असलं तरी चालेल. पण मनाने कधीच गरीब होऊ नकोस.”
तुम्ही सांगितलं, “शिक्षण कमी असलं तरी चालेल. पण मोठ्यांचं ऐकायला कान मोठे ठेव.”
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रघुनाथने आपल्या कृतीतून दाखवून दिलं…
“देवळात जाण्यापेक्षा, देव घरी आजारी असेल तर त्याची सेवा कर. तीच खरी वारी आहे.”

रघुनाथ आणि मी. आम्ही रक्ताचे बंधू आहोत.
पण आम्ही त्याहीपेक्षा जास्त
एकमेकांचे मित्र आहोत .
कारण गावावरून ठाण्याला आल्यापासून आम्ही दोघेही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत अडचणींना उपयोगी पडलेलो आहे व काम करताना एकमेकांच्या सहकार्याने करतो रामकृष्ण दादांची शिकवण होती की नातं हे त्यागाने जुळतं, नावाने नाही.

तुम्ही गेला नाहीत.
जोपर्यंत एखादा मुलगा आपल्या बापासाठी वारी सोडेल,
जोपर्यंत एखादा शेतकरी पहाटे उठून मातीशी बोलेल,
तोपर्यंत तुम्ही आमच्यात जिवंत राहाल.
कारण काही माणसं मरत नाहीत…
ती संस्कार बनून, आठवणी बनून, माती बनून जगत राहतात.
विठ्ठल तात्यांना भावपूर्ण आदरांजली
राम कृष्ण हरी

सत्य अनुभव शब्दांकन – नवनीत रामकृष्ण सिनलकर

Related posts

ग्रामपंचायत जवळे ने घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी राबवली अनोखी संकल्पना!!

Chief Editor

एरोकोड कंपनीमध्ये समर्थ अभियांत्रिकी च्या ५ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडित जवाहरलाल नेहरू व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी !!

Chief Editor

Leave a Comment