
तालुकास्तरीय स्पर्धेत पाच पदकांची कमाई; चार संघांनी पटकावले द्वितीय क्रमांक !!
पंचनामा प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित जुन्नर तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज बेल्हे खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पाच पदकांची कमाई केली. नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत समर्थच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुले मुली द्वितीय क्रमांक, १९ वर्षे खालील मुले मुली द्वितीय क्रमांक व १४ वर्षाखालील मुली तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या एकूण पाच संघांनी पदकांची कमाई केली.
स्पर्धेतील सामन्यांमध्ये समर्थच्या खेळाडूंनी जिद्द, आत्मविश्वास, शिस्त, चपळता आणि सांघिक समन्वय यांचे प्रभावी प्रदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीतही शेवटपर्यंत झुंज देत खेळाडूंनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. नियमित सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना हे यश मिळाले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जि.प. सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
खेळाडूंना क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षकg सुरेश काकडे, विनायक वन्हाडी व अश्विनी जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


