सामाजिक

कै.कस्तुराबाई जाधव यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कलाविश्वात शोककळा ; दीपक शेठ जाधव यांच्या मातोश्रींचे निधन ; फडमालक, कलावंत आणि रसिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

1011710516
1011710516

पंचनामा प्रतिनिधी – आई म्हणजे मायेचा अथांग सागर, प्रेमाची सावली आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आधार देणारे जिवंत दैवत! जगाच्या बाजारात सर्व काही मिळू शकते; मात्र एकदा हरवलेली आई पुन्हा कधीच मिळत नाही. आईच्या मायेची किंमत तिच्या अस्तित्वात असताना अनेकदा जाणवत नाही; परंतु तिच्या जाण्यानंतर आयुष्यभर तिच्या आठवणींची शिदोरी सोबत राहते. अशाच मायेची सावली हरपल्याने घोडेगाव (ता. नेवासा) येथील कलाप्रेमी, थोर अभ्यासक आणि महाराष्ट्रातील कलाविश्वात परिचित असलेले दीपक शेठ जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दीपक शेठ जाधव यांच्या मातोश्री कै. कस्तुराबाई रंगनाथ जाधव यांचे अल्पशा आजाराने दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रातील फडमालक, तमाशा कलावंत, कलाकार, रसिक आणि हितचिंतकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एक प्रेमळ आणि संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

कै. कस्तुराबाई जाधव यांना दीपक शेठ जाधव, अरुण काका जाधव आणि रमेश जाधव असे तीन मुलगे आहेत. त्यांना मुलगी नव्हती; मात्र त्यांनी मंदारानी खेडकर यांना मानसकन्या मानून मुलीप्रमाणे प्रेम दिले. विशेष म्हणजे, स्वतःचे औपचारिक शिक्षण झालेले नसतानाही त्यांनी आपल्या मुलांच्या संगोपनात कोणतीही कमतरता ठेवली नाही. मुलांना चांगले संस्कार, प्रामाणिकपणा, कष्टाची जाणीव, माणुसकी आणि एकमेकांबद्दल आदरभाव यांचे बाळकडू दिले.

आईने दिलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन आज तिन्ही भाऊ आपापले व्यवसाय आणि व्यापार सांभाळत गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत. एकमेकांशी सलोख्याचे संबंध जपत त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्राशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि रसिकांची सेवा करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. या यशाच्या आणि प्रतिष्ठेच्या प्रवासामागे आई कस्तुराबाई यांनी दिलेले संस्कार, त्याग आणि कष्ट यांचा मोठा वाटा आहे.

कै. कस्तुराबाई यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. साधेपणा हा त्यांच्या स्वभावाचा अलंकार होता. खरे बोलणे, प्रत्येकाशी प्रेमाने वागणे, शेजाऱ्यांशी आपुलकीचे संबंध ठेवणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे, दानधर्म करणे आणि घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा प्रेमाने आदर-सत्कार करणे हे त्यांचे जीवनातील महत्त्वाचे संस्कार होते. त्यांच्या स्वभावातील माणुसकीमुळे त्या परिसरात सर्वांच्या आदरास पात्र ठरल्या होत्या.

आईच्या आठवणींनी दीपक शेठ भावूक

मातोश्रींच्या निधनानंतर दीपक शेठ जाधव यांना आपल्या आईसोबत घालवलेले बालपणापासूनचे अनेक प्रसंग आठवू लागले. आईने लहानपणापासून आजपर्यंत आपल्याला कसे जपले, संकटांच्या काळात कसा आधार दिला, कष्ट करून मुलांना कसे मोठे केले आणि प्रत्येकाच्या आयुष्याला योग्य दिशा कशी दिली, या आठवणींनी ते अत्यंत भावूक झाले.

आईच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. आईचे प्रेम, तिची माया, तिचे संस्कार आणि तिच्या सहवासातील क्षण आठवून त्यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी दीपक शेठ म्हणाले की, “आई ही आयुष्याची सावली असते, तर बाप हे घराचे वैभव असते. आई-वडील आपल्या मुलांसाठी संपूर्ण आयुष्य झिजवतात. आपल्या मुलांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांचा त्याग करतात. मात्र त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या प्रेमाची आणि त्यागाची खरी जाणीव अनेकदा होत नाही. त्यांच्या जाण्यानंतर मात्र त्यांच्या अस्तित्वाची खरी किंमत समजते. आईने आम्हाला लहानपणापासून ज्या मायेने वाढवले, चांगले संस्कार दिले आणि आयुष्य जगण्याची शिकवण दिली, ते ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही.”

त्यांच्या या भावना ऐकून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. खरोखरच आई-वडिलांचे छत्र हरपणे म्हणजे आयुष्यातील सर्वांत मोठी पोकळी निर्माण होणे होय.

दशक्रिया विधी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी

कै. कस्तुराबाई रंगनाथ जाधव यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कायगाव येथील गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर संपन्न होणार आहे. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार, कलावंत, फडमालक, रसिक आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन जाधव कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येत आहे.

आईचे जाणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचे जाणे नसते, तर घरातील मायेचा आधार, आशीर्वादाचे छत्र आणि संस्कारांचा जिवंत झरा हरपणे असते. कै. कस्तुराबाई जाधव यांनी आपल्या साध्या राहणीमानातून, प्रेमळ स्वभावातून आणि उत्तम संस्कारांतून कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेले संस्कार सदैव जाधव कुटुंबीयांच्या जीवनात प्रेरणादायी राहतील.

भावपूर्ण श्रद्धांजली!

आईची माया कधीच संपत नाही, ती केवळ आठवणींच्या रूपाने आयुष्यभर सोबत राहते…

ॐ शांती! ॐ शांती!

लेखक : शाहीर खंदारे
तालुका नेवासा

Related posts

कनेरसरमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !!

Chief Editor

आंबेगावातील पूर्व भागात पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला मकर संक्रांतीचा सण !!

Chief Editor

थोरांदळे प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती व एन.एम.एम.एस परीक्षेत उल्लेखनीय यश !!

Chief Editor

Leave a Comment