
पंचनामा प्रतिनिधी शिरदाळे – छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास आणि गड-किल्ल्यांचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून विविध गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. किल्ल्यांची रचना, सजावट आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि कल्पकतेचे कौतुक करून त्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक सुदर्शन संभाजी भोर, द्वितीय क्रमांक ऋतिक कल्पेश सरडे, तृतीय क्रमांक ओम देविदास रणपिसे यांनी पटकावला. तसेच स्वप्नील केरभाऊ तांबे, शिवम उत्तम रणपिसे, शिवांश मयूर सरडे आणि पियुष टाकळकर यांनाही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड, सर्जनशीलता, श्रमप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याविषयी अभिमान निर्माण होण्यास मदत झाली. केवळ मातीचे किल्ले उभारण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता मुलांच्या मनात स्वराज्याचा इतिहास आणि शिवरायांचे विचार रुजविणारा ठरला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, हितचिंतक आणि आयोजकांचे आभार मानण्यात आले.


आयोजक : वृक्षवल्ली आम्हा सोयरे, शिरदाळे.

