
पंचनामा प्रतिनिधी नारायणगाव पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पंढरीनाथ किसन सुक्रे (वय ४४, रा. पारगाव तर्फे आळे, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ सुक्रे हे रविवारी सायंकाळी औरंगपूर बाजूकडून पारगाव तर्फे आळेच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुक्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारचालक अनिकेत दत्तात्रय फटांगडे (रा. कवठे यमाई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.
