
जांभोरी : जांभोरी (ता. आंबेगाव) येथे १० नोव्हेंबर २०२६ रोजी जांभोरी गावचे भूषण आदिवासी क्रांतिकारक लायन हार्टेड होनाजी भागू केंगले, जांभोरी गावचे पहिले आदिवासी सभापती स्वर्गीय शंकरराव विठू केंगले, आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.
या वेळी जांभोरी गावचे उपसरपंच बबन केंगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, जांभोरी ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य शिवराम केंगले, बिरसा ब्रिगेड जांभोरी शाखेचे अध्यक्ष सुनील गिरंगे, भीमा केंगले, प्रकाश केंगले, पेसा उपाध्यक्ष मीना केंगले, जांभोरी ग्रामपंचायत सदस्या भोराबाई केंगले, गणपत काठे, मंचर नगरपरिषदेचे नगरसेवक लखन पारधी, नितीन केंगले, मानाजी केंगले, गोविंद केंगले सर, धोंडू केंगले यांच्यासह जांभोरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होनाजी केंगले यांच्या ऐतिहासिक लढ्याला उजाळा
जांभोरी ही आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. सन १८७५-७६ मध्ये लायन हार्टेड होनाजी भागू केंगले यांनी इंग्रज आणि सावकारशाहीविरुद्ध लढा उभारला होता. त्या काळात हत्तीचंद व गुप्तचंद या सावकारांविरुद्ध त्यांनी संघर्ष केला होता. या संघर्षात होनाजी केंगले यांनी संबंधित सावकारांची नाके कापल्याची ऐतिहासिक घटना सांगितली जाते. होनाजी केंगले यांना पकडण्यासाठी इंग्रज व सावकारशाहीकडून ६०० ते १,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यांच्या या धाडसी संघर्षाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची मागणी
जांभोरी गावात लायन हार्टेड होनाजी भागू केंगले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा आंबेगाव-शिरूर तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून केली आहे.
या मागणीची दखल घेत आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊन स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सांगितले होते. त्यामुळे जांभोरी येथे लवकरच भव्य स्मारक उभारले जावे आणि या महान क्रांतिकारकांचा इतिहास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


