सामाजिक

खंडोबा-म्हाळसाई-बाणाईच्या उत्सवमूर्तींना शाहीस्नान; हजारो भाविकांची उपस्थिती, पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीची भव्य मिरवणूक

1011639023

धामणीत सोमवतीला ‘सदानंदाचा येळकोट’चा जयघोष!

1011638339

पंचनामा प्रतिनिधी मंचर : पुणे, नगर, नाशिक आणि मुंबई जिल्ह्यांतील हजारो भाविकांचे कुलदैवत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबाच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेपासून सुरू झालेल्या धार्मिक विधी, उत्सवमूर्तींचे शाहीस्नान, पालखीची भव्य मिरवणूक आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषाने संपूर्ण धामणी परिसर भक्तिमय झाला होता.

रविवारी (दि. ८ नोव्हेंबर) दुपारी अमावस्येला प्रारंभ झाला होता. सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सोमवतीचा पर्वकाळ असल्याने पहाटे पाच वाजता शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांतील खंडेरायाच्या सोमवतीचे व मानाच्या काठीचे दहा मानकरी यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक व आरती करण्यात आली.

1011638329

त्यानंतर सकाळी सात वाजता उगवत्या सूर्याच्या साक्षीने गावातून वाघे व वीर मंडळींनी खंडोबा मंदिरात आणलेल्या पालखीत खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या उत्सवमूर्ती विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर पालखीने वाजतगाजत देवमळ्यातील विहिरीकडे शाहीस्नानासाठी प्रस्थान केले. यावेळी भंडारा, खोबरे व फुलांची उधळण करीत ‘सदानंदाचा येळकोट’चा जयघोष करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सोमवतीच्या पालखीला सलामी देण्यात आली.

सरत्या २०२६ वर्षातील दुसरी व शेवटची सोमवती असल्याने तसेच पर्वकाळ सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत असल्याने शाहीस्नानाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखीतून देवाचे मुखवटे सोमवतीच्या स्नानाच्या ओट्यावर आणण्यात आले. सोमवती पालखीचे व मानाच्या काठीचे मानकरी असलेल्या नरके, राजगुरू, कांदळकर, गावडे, पडवळ, वायकर, पंचरास, घोडे, बोरचाटे, आवटे, कुरकूटे आणि मेंगडे या कुळ आडनावांच्या मंडळींच्या हस्ते मुखवट्यांना सुवासिक दवण्याचे अत्तर व गुलाबपाण्याचे मिश्रण करून चंदनऊटीचा लेप देण्यात आला. त्यानंतर उत्सवमूर्तींना विधिवत शाहीस्नान घालण्यात आले.

1011638320

देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, राजेश भगत, शांताराम भगत, सिताराम जाधव (वाघे), दिनेश जाधव, सुरेश पवार, पांडुरंग भगत, राहुल भगत, प्रमोद देखणे, भिकाजी पाटील आणि अनिरुद्ध वाळुंज यांनी खंडेरायाची पूर्वापार चालत आलेली पारंपरिक पूजा केली. त्यानंतर आरती करण्यात आली.

सोमवतीचे मानकरी, सेवेकरी, खांदेकरी तसेच खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यांतील विविध आडनावांच्या कुळांतील महिला व पुरुष भाविकांचा भंडाऱ्याच्या रंगाची पिवळी टोपी व पिवळी शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर फुले व भंडाऱ्याची उधळण करीत पालखीच्या शाही मिरवणुकीला सुरुवात झाली.

1011639022

समस्त पंचरास मंडळींच्या हालगी, डफडे, ताशा, संबळ, सनई, शिंगाड आणि तुतारी या पारंपरिक वाद्यांच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला होता. पालखी मिरवणुकीत भाविकांनी परिधान केलेल्या पिवळ्या टोप्या विशेष लक्षवेधी ठरत होत्या. धामणीच्या पेठेतून पालखी जात असताना ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात फुलांची व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीचा उत्साह अधिकच वाढला.

या मिरवणुकीत पालखीच्या पुढे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पवार बंधूंचा खंडोबाचे वाहन असलेला सजवलेला रुबाबदार अश्व सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. सकाळी अकरा वाजता पालखीची शाही मिरवणूक वाजतगाजत मंदिरात विसावल्यानंतर पालखीतील देवाच्या उत्सवमूर्ती सेवेकरी भगत मंडळींच्या स्वाधीन करण्यात आल्या.

1011639020

सोमवतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने भात, आमटी आणि बुंदीच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी एक वाजेपर्यंत दोन हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ऐन दिवाळीच्या काळात सोमवतीचा सोहळा आल्याने यंदाच्या उत्सवाला विशेष रंगत आली होती.

शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी तळेगाव ढमढेरे, गावडेवाडी, महाळुंगे पडवळ, लांडेवाडी, संविदणे, कवठे, बेल्हा, मरकळ, नांदूर, कुरकूटवाडी, गुंजाळवाडी, पाडळी, लोणी, खडकवाडी, पारनेर, भराडी, फाकटे, पाबळ आणि रानमळा आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. दुचाकी व चारचाकी वाहनांनी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. मंदिराबाहेर खोबरे, भंडारा, फुले आणि पेढ्यांची दुकाने सजली होती. यावेळी मंदिरात पंचनाम जागरण सुरू होते.

1011639017

अशा प्रकारे धार्मिक विधी, शाहीस्नान, पारंपरिक वाद्यांचा गजर, पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाच्या माध्यमातून धामणीतील सोमवती अमावस्येचा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला.

1011605851
1011605850

Related posts

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी- कृषी विभागाचे आवाहन !!

Chief Editor

जारकरवाडी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पारगाव कारखाना पोलीसांकडून जनजागृती !!

Chief Editor

“शिवकन्या रेशमा कुटे यांना ‘पहिली आयर्नमॅन महिला’ होण्याचा बहुमान” !!

Chief Editor

Leave a Comment