
पंचनामा प्रतिनिधी – ज्या भूमीने छत्रपती शिवरायांचा जीवनपट आणि युद्धातील गनिमी काव्याचा अभ्यास करून अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेचा पराभव केला; त्याच व्हिएतनामच्या भूमीवर शिवजन्मभूमीतील नेतवड गावची शिवकन्या रेशमा कुटे यांनी जुन्नर तालुक्यातील ‘पहिली आयर्नमॅन महिला’ होण्याचा बहुमान पटकावला.
रविवार दिनांक १० मे रोजी व्हिएतनाम येथे झालेल्या स्पर्धेत ‘१८० कि. मी. सायकल, ४२ कि. मी. रनिंग आणि ३.८ कि. मी. स्विमिंग’ असे अंतर निर्धारित वेळेअगोदर पूर्ण करून रेश्मा कुटे यांनी ‘फुल्ल आयर्नमॅन’ हा किताब प्राप्त केला आहे. मुख्य म्हणजे ज्या सायकलवर रेशमा यांनी स्पर्धेसाठी संपूर्ण सराव केला ती सायकल मुंबई एअरपोर्टवर एअरलाइन्सच्या अचानक बदललेल्या काही अटींमुळे नेता आली नाही त्यामुळे ती सायकल उपलब्ध नसतानाही व्हिएतनाममध्ये घेतलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या दोष असलेल्या भाड्याच्या सायकलवर रेशमा कुटे यांनी ही स्पर्धा त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पूर्ण केली याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत असणाऱ्या रेशमा कुटे यांनी गतवर्षी दक्षिण अफ्रिकेतील जगप्रसिद्ध ‘काॅम्रेड मॅरेथॉन’ १० तास १६ मि. २० सेकंदात पूर्ण करून ब्राॅझ पदक जिंकले होते. गेल्या दोन वर्षांत रेशमा कुटे यांनी भारत आणि भारतात बाहेरील ६५ हून अधिक छोट्या – मोठ्या स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.
जुन्नर तालुक्यातील ‘पहिली आयर्नमॅन महिला’ रेशमा कुटे यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
स्तंभलेखक संजय नलावडे
(धोलवड, मुंबई निसर्गरम्य जुन्नर – भूमी गुणिजनांची’)


