सामाजिक

लोकनाट्य तमाशा रसिकांसाठी आनंदपर्वणी ; बेल्हे लोककला महोत्सवाची रंगणार तीन दिवस सांस्कृतिक मेजवानी !!

img 20261124 wa0908
1011804571

संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सलग चौदाव्या वर्षी आयोजन; वसंतराव जगताप यांच्या गायकीतून जुन्या आठवणींना उजाळा

पंचनामा प्रतिनिधी बेल्हे : अवघ्या महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा रसिकांना दरवर्षी आतुरतेने प्रतीक्षा असणारा आणि जुन्या लोककलेच्या वैभवशाली परंपरेला उजाळा देणारा बेल्हे लोककला महोत्सव यंदाही दि. २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात रंगणार आहे. लोकनाट्य तमाशा, लोकगीते, वगनाट्य आणि पारंपरिक कलाविष्कारांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तसेच साईकृपा सहकारी पतसंस्था, बेल्हेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय वसंतराव जगताप यांच्या पुढाकारातून, कलाप्रेमी संचालक मंडळ आणि बेल्हे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या चौदा वर्षांपासून हा महोत्सव सातत्याने आयोजित केला जात आहे. अतिशय नेटके आणि सुनियोजित नियोजन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

जुन्या तमाशा कलावंतांच्या आठवणींना उजाळा

सुमारे चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी यात्रा हंगामात तसेच आळंदी यात्रेदरम्यान लोकनाट्य तमाशा मंडळांच्या कार्यक्रमांना मोठी लोकप्रियता होती. त्या काळातील वगसम्राट मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर, संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर, विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर, वगनाट्य लेखक गणपत व्ही. माने चिंचणीकर, तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, विठाबाई नारायणगावकर, दगडू साळी शिरोलीकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, साहेबराव नांदवळकर, शिवराम बोरगावकर, गणपतराव जगताप पिंपळेकर, बाबुराव पडवळ सविंदणेकर, गंगाराम कवठेकर, काळू-बाळू कौलापूरकर आदी कलावंतांनी या लोककलेचा वारसा समृद्ध केला.

अलीकडच्या काळात मंगला बनसोडे करवडीकर, संध्या माने सोलापूरकर आदी फडमालकांनीही लोकनाट्य तमाशाची परंपरा पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. मनोरंजनाबरोबरच लोकजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून केले आहे.

वसंतराव जगताप यांच्या गायकीतून जुन्या काळाची अनुभूती

बदलत्या काळात प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव आणि मनोरंजनाची बदलती साधने यामुळे पारंपरिक लोककलेसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देत लोककलेचा वारसा जिवंत ठेवण्याचे काम वसंतराव जगताप (अण्णा) अत्यंत निष्ठेने आणि आत्मीयतेने करत आहेत.

स्वतः अभिजात गायक असलेले जगताप अण्णा विविध लोकप्रिय लोकगीते, स्फूर्तीगीते आणि संस्कारगीते यांचा नियमित रियाज व साधना करतात. केवळ रसिकांच्या आग्रहास्तव ते ही गीते सादर करतात. विशेष म्हणजे संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांची गायकी त्यांनी आत्मसात केली असून, त्याच गायकीच्या माध्यमातून जुन्या पिढीतील रसिकांना ते पुन्हा त्या सुवर्णकाळात घेऊन जातात.

‘खरं बुडालं, देव पळालं, कुणी कुणाला नाय बोलायचं, हे असंच चालायचं’ अशा बहारदार गीतांच्या सादरीकरणातून वातावरण भारावून जाते. त्यांच्या गायकीला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो.

अनुभवी कलावंतांची वाद्यसाथ

या सादरीकरणाला लोकनाट्य तमाशा कलावंत आणि वगनाट्य लेखक आदरणीय मुरलीधर शिंदे बोरगावकर तथा तात्या यांची हार्मोनियमची साथ लाभते, तर संदीप पंचरास यांची ढोलकीची साथ कार्यक्रमात रंगत आणते. गायकी आणि वाद्यसंगीताच्या या सुरेल संगमातून रसिकांना जुन्या तमाशा परंपरेचा अविस्मरणीय अनुभव मिळतो.

तीन दिवस लोककलेची सांस्कृतिक मेजवानी

जुन्या पिढीतील तमाशाप्रेमी रसिकांसह नव्या पिढीलाही महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेची ओळख व्हावी, या उद्देशाने बेल्हे लोककला महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे हा महोत्सव केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता लोककलेचा वारसा जपणारा सांस्कृतिक उपक्रम ठरत आहे.

तरी लोकनाट्य तमाशा रसिकांनी दि. २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी बेल्हे नगरीत उपस्थित राहून या लोककला महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

या सुंदर सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या वसंतराव जगताप, कलाप्रेमी संचालक मंडळ आणि बेल्हे ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! बेल्हे लोककला महोत्सवास मनःपूर्वक शुभेच्छा!

लेख – श्री.लक्ष्मण झुंबरशेठ वाळुंज
मा.प्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मंचर

1011785592

Related posts

पुणे जिल्हा परिषदेकडून शेतकरी व पशुपालकांना ७५ टक्के अनुदानाची सुवर्णसंधी ; कृषी अवजारे, मिल्किंग मशीन, गोठा साहित्यांसह विविध साधनांचा योजनेंतर्गत लाभ; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर

Chief Editor

समर्थ शैक्षणिक संकुलात ‘डिप्लोमा प्रवेश मार्गदर्शन व सुविधा केंद्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

Chief Editor

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे सोमवार दि.२० एप्रिल २०२६ ते बुधवार दि.२२ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार जय हनुमान यात्रा उत्सव !!

Chief Editor

Leave a Comment