सामाजिक

धामणी येथील खंडोबा मंदिरात देवदिवाळी उत्साहात; अष्टदल धान्यपूजा संपन्न !!

1011801802

कार्तिक स्नान समाप्ती, त्रिपुरारी पौर्णिमा व हरिहर भेटीनिमित्त पारंपरिक महापूजा; शेकडो भाविकांची उपस्थिती

1011801802

पंचनामा प्रतिनिधी – मंचर : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक स्नान समाप्ती, तुळशी विवाह समाप्ती आणि हरिहर भेटीनिमित्त पारंपरिक अष्टदल धान्य, फुले व फळांची पूजा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वाद्यांचा गजर, पुरातन घंटेचा निनाद आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या निमित्ताने पारंपरिक महापूजा गणेश नरके व पूजा नरके (तळेगाव ढमढेरे), प्रशांत कांदळकर व आशा कांदळकर (कवठे यमाई), स्वप्नील सिन्नरकर व गायत्री सिन्नरकर (लोणी), बाळशीराम साळगट व सुनीता साळगट (पोंदेवाडी), संजय बबनराव बढेकर वंदना बढेकर (धामणी) या पाच जोडप्यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली.

1011801806

त्यानंतर सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, शांताराम भगत, सुभाष तांबे, राजेश भगत, आदित्य भगत, अनिरुद्ध वाळुंज व प्रमोद देखणे यांनी मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंगावर हुलगे, मूगडाळ, हरभरा डाळ, राजमा, जवस, तूरडाळ, उडीदडाळ, मठ आणि तांदूळ या धान्यांचे अर्पण करून अष्टदल धान्यपूजा केली. त्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली.

मंगळवारी पहाटे मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सुवासिक फुलांनी सजविलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगासह पंचधातूच्या मुखवट्यांना सुवासिक भंडाऱ्याचा लेप लावण्यात आला होता. गाभारा व सभामंडपात मोगरा, झेंडू आणि अष्टरच्या फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या शिखरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळ्या, शेकडो प्रज्वलित पणत्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता.

1011801826

कपाळावर भंडाऱ्याचा मळवट लावून आबालवृद्ध भाविक हरिनामाच्या गजरात सहभागी झाले होते. देवदिवाळीच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त महिला भाविकांनी खंडोबा देवाला नैवेद्य अर्पण केला. खंडोबाच्या दर्शनासाठी अवसरी खुर्द, गावडेवाडी, महाळुंगे पडवळ, तळेगाव ढमढेरे, लोणी, सविंदणे, कवठे, खडकवाडी, वडगावपीर, पाबळ, मरकळ आदी गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्तिक महिन्यातील धार्मिक परंपरा, सामूहिक भक्तिभाव आणि अष्टदल धान्यपूजेच्या माध्यमातून धामणी येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात देवदिवाळीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

1011785549
1011785601

Related posts

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होणार अखंड हरिनाम सप्ताह!!

Chief Editor

खडकवाडी गावचे मा.सरपंच अनिलशेठ डोके यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव !!

Chief Editor

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब देवाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या चिंचेच्या झाडावर वीज कोसळली !!

Chief Editor

Leave a Comment