
पंचनामा प्रतिनिधी | निरगुडसर
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सिद्धी ज्ञानेश्वर आदक हिची राजस्थानमधील ऐतिहासिक हळदीघाटी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या एनसीसी ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्पसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या शिबिरासाठी निवड झाल्याने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून निरगुडसर, वडगावपीर व लोणी परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिद्धी आदक ही इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असून एनसीसीच्या द्वितीय वर्षात आहे. शनिवार (दि. २१) ते सोमवार (दि. ३०) या कालावधीत राजस्थानमधील ऐतिहासिक हळदीघाटी येथे दहा दिवसीय ट्रेकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात देशाच्या विविध भागांतून एनसीसीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राजस्थानमधील भौगोलिक परिस्थिती, विविध वातावरणातील बदल, निसर्गसौंदर्य आणि ट्रेकिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर शिस्त, साहस, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्याची संधीही मिळणार आहे.
सिद्धीच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते प्रतापराव वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, सचिव प्रकाश तापकीर, संचालक व प्राचार्य सुनील वळसे पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.
विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, क्रीडाशिक्षक भरत खिलारी तसेच सर्व शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील एनसीसी शिबिरात सहभागी होण्याचा मान मिळवणे ही अभिमानास्पद बाब असून, तिच्या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळणार आहे.
— ॲड. प्रदीप वळसे पाटील
अध्यक्ष, निरगुडेश्वर शिक्षण संस्था



