
पंचनामा प्रतिनिधी नाशिक : गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या 3rd World Thaiboxing Championship 2026 या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत नाशिकचे प्रतिभावान खेळाडू, प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच जय सोनवणे (टायगर) यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यांच्या या देदीप्यमान यशामुळे नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गोवा येथील बॉक्सिंग हॉल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पेड्डेम, म्हापसा येथे दिनांक १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वर्ल्ड थायबॉक्सिंग फेडरेशन (WTF) यांच्या मान्यतेने आणि थायबॉक्सिंग इंडियन फेडरेशन (TIF) यांच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत भारतासह एकूण नऊ देशांतील तब्बल २७५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत जय सोनवणे (टायगर) यांनी फुल कॉन्टॅक्ट (Full Contact) थायबॉक्सिंग प्रकारातील पुरुषांच्या ८० किलोखालील वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याचा, आक्रमक खेळाचा, शारीरिक क्षमतेचा आणि आत्मविश्वासाचा परिचय देत श्रीलंका आणि नेपाळ या दोन देशांतील प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात केली. दोन्ही आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत त्यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

विशेष म्हणजे, जय सोनवणे हे केवळ उत्कृष्ट खेळाडूच नसून ते प्रशिक्षक, कोच तसेच राष्ट्रीय स्तरावरील पंच म्हणूनही कार्यरत आहेत. खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करताना पंच म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट रेफरींगची जबाबदारी पार पाडली. खेळाडू आणि पंच अशा दोन्ही भूमिका यशस्वीपणे सांभाळत त्यांनी आपल्या अष्टपैलू क्रीडा कौशल्याची प्रचिती दिली आहे.
या यशामागे प्रशिक्षक व मार्गदर्शक संतोष देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त, योग्य तांत्रिक मार्गदर्शन आणि खेळाप्रती असलेले समर्पण यांच्या जोरावर जय सोनवणे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
जय सोनवणे (टायगर) यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल थायबॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशन ऑफ नाशिकच्या अध्यक्षा अर्चना देशमुख, प्रशिक्षक व मार्गदर्शक संतोष देशमुख तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील खेळाडूने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर श्रीलंका आणि नेपाळसारख्या देशांतील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सुवर्णपदक मिळवणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची प्रेरणा मिळणार आहे.
जय सोनवणे (टायगर) यांच्या या सुवर्णमय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
— थायबॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशन ऑफ नाशिक



