
पंचनामा प्रतिनिधी | लोणी :
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त लोणी-धामणी परिसरात रब्बी हंगामातील पिकांवर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी होत असून, उपलब्ध पाणीसाठाही झपाट्याने घटत आहे. त्यामुळे कांदा, गहू आणि हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
आंबेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याने रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनला आहे. लोणी-धामणी परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा, गहू, हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
सध्या परिसरात कांदा काढणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, शेतात उभे असलेले उर्वरित कांदा पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची उपलब्ध पाण्यावर कसरत सुरू आहे. कांद्याला कसेबसे पाणी देऊन पीक टिकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे गहू आणि हरभरा पिकांना गरजेच्या वेळी पाणी देणे शक्य होत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाण्याचे नियोजन ठरणार महत्त्वाचे
दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. गहू आणि हरभरा पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाणी मिळाले नाही, तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याबरोबरच पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याची भीती
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मशागत आणि लागवडीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पाणीटंचाई निर्माण झाल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
“कांद्याला कसेबसे पाणी पुरेल; मात्र गहू आणि हरभरा पाण्याअभावी हाती लागेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी व्यथा परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे लोणी-धामणी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.



