
पहाटेच्या काकड आरतीने महिनाभर गाव दुमदुमले; काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता !!
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या काकड आरती सोहळ्याची भक्तिमय वातावरणात उत्साहात सांगता झाली. या निमित्ताने ह.भ.प.भरत महाराज अनंत सर यांची काल्याची किर्तन सेवा संपन्न झाली.महिनाभर दररोज पहाटेच्या मंगलमय वातावरणात होणाऱ्या काकड आरतीमध्ये गावातील आबालवृद्धांसह सर्व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सोहळ्याच्या सांगतेनिमित्त काल्याच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.




काकड आरतीचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मपरंपरेत कार्तिक महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात पहाटे लवकर उठून स्नान, देवदर्शन, भजन, नामस्मरण आणि काकड आरती करण्याची परंपरा आहे. विशेषतः भगवान श्रीविठ्ठलाच्या उपासनेत काकड आरतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहाटेच्या वेळी देवाला जागृत करून आरती, अभंग आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून ईश्वराची आराधना केली जाते. काकड आरतीमुळे मनाला प्रसन्नता, भक्तिभाव आणि आध्यात्मिक समाधान मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.


परंपरेनुसार काकड आरतीचा सोहळा कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत किंवा काही ठिकाणी संपूर्ण कार्तिक महिन्यात पहाटे आयोजित केला जातो. या काळात मंदिरांमध्ये पहाटेपासून भजन, हरिनामाचा गजर, आरती आणि भक्तिसंगीताने वातावरण भक्तिमय होते. जारकरवाडी येथेही गेल्या महिनाभरापासून ही परंपरा उत्साहाने जपण्यात आली.

धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव
जारकरवाडी गावाला धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. गावातील पांडुरंग मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र व सीतामाई यांनी शिवलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका सांगितली जाते. मंदिरामध्ये अजिंठा-वेरूळच्या लेण्यांच्या धर्तीवरील कोरीव काम आढळून येते. तसेच मंदिरासमोरील परिसरात मोहेंजोदडो व हडप्पा संस्कृतीची आठवण करून देणारे अपूर्ण स्वरूपातील उत्खनन पाहायला मिळते.

धार्मिक परंपरा जपण्यात ग्रामस्थ आघाडीवर
गावात वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसऱ्याच्या दिवशी बिरोबा मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, तर वडजादेवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

गावाला बारमाही बागायती पाण्याची उपलब्धता असल्याने येथील शेतीही बारमाही बागायती झाली आहे. धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्याचे काम ग्रामस्थ करीत आहेत. गावातील प्रत्येक धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय असतो.

महिनाभर चाललेल्या काकड आरती सोहळ्याच्या सांगतेने गावातील भक्ती, श्रद्धा, एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. पुढील पिढीपर्यंत धार्मिक परंपरा पोहोचविण्याचे काम जारकरवाडीतील ग्रामस्थ एकजुटीने करीत असल्याचे या सोहळ्यातून अधोरेखित झाले.
आदर्श ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजने यांनी महाप्रसादाचे सौजन्य अर्पण केले तर कीर्तन सौजन्य उद्योजक अनिल लबडे यांच्याकडून लाभले अशी माहिती संयोजक बाळासाहेब भोजने, अध्यक्ष अशोक भोजने, उपाध्यक्ष दिलीप वनवे, संचालक दगडू देवडे, बाळासाहेब वनवे,पंढरीनाथ काकडे,रमेश पाचपुते,ज्ञानेश्वर भोसले,आशा भोजने,हिराबाई भोजने,मीनाक्षी भोजने यांनी दिली.कार्यक्रमाचे निवेदन सोपान पाबळे, बाबाजी देवडे, निवृत्ती भांड यांनी केले.



