
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथे रांजणगाव एमआयडीसी मधील जपानी बहुराष्ट्रीय कंपनी, जेएफई शोजी स्टील इंडिया प्रा. लि. यांच्यातर्फे आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची निवड झाली.महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या वतीने या निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नामांकित औद्योगिक कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळविण्याची आणि करिअरची भक्कम सुरुवात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची तांत्रिक मुलाखत घेऊन त्यांच्या विषयज्ञानाची, तांत्रिक कौशल्यांची आणि औद्योगिक क्षेत्रात काम करण्याच्या क्षमतेची पडताळणीकेली. इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपनीत पूर्णवेळ कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच औद्योगिक क्षेत्रातील कामकाजाची ओळख, व्यावहारिक अनुभव आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संधी मिळणार आहे.
कंपनीचे उपमहाव्यवस्थापक संजय कुमार सूर्यवंशी, एच.आर. मॅनेजर रेश्मा येळनुरे आणि प्रज्ञा भालेराव यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती देताना स्टील प्रोसेसिंग उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, सीएनसी मशीनचे कार्य, तसेच कटिंग आणि स्लिटिंग लाईनच्या प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक ज्ञानासोबतच अचूकता, शिस्त, सुरक्षितता, वेळेचे नियोजन आणि संघभावना यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन महाविद्यालयाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. सचिन पोखरकर यांनी केले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, विभागप्रमुख प्रा.निलेश नागरे, प्रा. निर्मल कोठारी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके आणि कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


