
पंचनामा प्रतिनिधी – दिवाळीचा आनंद गोडधोड पदार्थ आणि रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता त्याला ज्ञान आणि विचारांची जोड देत समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संकुलातील ग्रंथालय विभागांच्या वतीने ‘बौद्धिक दिवाळी फराळ’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे कमी होत चाललेली वाचनाची सवय पुन्हा रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे आणि वैचारिक समृद्धी साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यानिमित्त विविध विषयांवरील ४० हून अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी दिवाळीच्या पारंपरिक फराळाबरोबरच ज्ञान, साहित्य आणि सकारात्मक विचारांचा आस्वाद घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
‘गोडवा फक्त जिभेचा नाही, तर विचारांचा...!’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आयोजित या उपक्रमातून वाचनाचे महत्त्व आणि वैचारिक प्रगल्भतेची गरज अधोरेखित करण्यात आली. दिवाळी अंकांमधील साहित्य, सामाजिक विषय, वैचारिक लेख आणि प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञानाची नवी दालने खुली करून देतात. वाचनातून विचारक्षमता, कल्पनाशक्ती आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.अनिल कपिले, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, माजी प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, आय.टी.आयचे प्राचार्य विष्णू मापारी, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, डॉ. रमेश पाडेकर, क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल प्रा. गणेश नवले, शीतल खुटाळ, ज्ञानेश्वर सावळे, सुजाता आवटे, संजीवनी गायकवाड, चंद्रसेन गडकरी आणि विकास शेलार यांनी विशेष योगदान दिले. समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे ग्रंथपाल डॉ. उद्धव भारती यांनी सूत्रसंचालन केले.
दिवाळीचा आनंद आरोग्यदायी जीवनशैली, साहित्याची गोडी आणि वैचारिक समृद्धी यांच्याशी जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याबरोबरच ज्ञान आणि विचारांची शिदोरी देणारा ठरला.


