
शिक्षण पूर्ण करून सैन्यात दाखल होत देशरक्षणासाठी वाहिली तीन दशके; गावाच्या सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर !!
पंचनामा प्रतिनिधी धामणी – आंबेगाव तालुक्यातील धामणी गावचे सुपुत्र श्री.सुरेश लक्ष्मण विधाटे यांनी भारतीय सैन्यात तब्बल ३० वर्षे देशसेवेचे व्रत जोपासल्यानंतर सेवानिवृत्ती झाले. देशाच्या संरक्षणासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावणाऱ्या विधाटे यांच्या या गौरवशाली प्रवासामुळे धामणी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गावात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशसेवेची जिद्द मनाशी बाळगून सुरेश विधाटे सैन्यात भरती झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यातील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तब्बल तीन दशके देशाच्या रक्षणासाठी आपले योगदान दिले. देशसेवा हेच सर्वोच्च कर्तव्य मानून त्यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला.
सैन्यातील सेवेसोबतच सुरेश विधाटे यांचे आपल्या गावाशी असलेले नातेही नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहे. गावातील कोणताही सुख-दुःखाचा प्रसंग असो, सामाजिक कार्य असो अथवा ग्रामस्थांना मदतीची गरज असो, विधाटे हे नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात. देशसेवेबरोबरच समाजसेवेचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची गावात विशेष ओळख आहे.
त्यांच्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेचा गौरव करताना धामणी ग्रामस्थांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सैन्यातील सेवेतून निवृत्त होत असले तरी समाजासाठी योगदान देण्याची त्यांची भावना कायम राहणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
देशसेवेचा अभिमान, समाजसेवेचा वसा!
सुरेश विधाटे यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या नव्या जीवनप्रवासासाठी त्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि आनंद लाभावा, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या देशसेवेचा धामणी गावाला सदैव अभिमान राहील, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
त्यांना भावी आयुष्यासाठी मा.पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले व समस्त ग्रामस्थ धामणी, शिरदाळे, पहाडदरा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


