
पंचनामा प्रतिनिधी वडगावपीर : वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील गुळवे वस्तीवर श्री गणपती व श्री शंभो महादेव मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन रविवार (दि. १३) करण्यात आले आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत पुण्याहवाचन, मातृका पूजन व होमहवन होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व यज्ञ पूर्णाहुतीचे धार्मिक विधी पार पडणार आहेत.

सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत लाखेवाडी (ता. शिरूर) येथील श्री हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास मा.मंत्री दिलीप वळसे पाटील, भोसरीचे मा.आमदार विलास लांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मा.जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

