
पंचनामा प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ पुणे,राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय विद्यापीठ स्तरीय युवक-युवती उन्नयन शिबिरामध्ये “सायबर गुन्हे आणि सुरक्षा” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातील १०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
या कार्यशाळेसाठी आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पन्हाळकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार,सोशल मीडियावरील फसवणूक,ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, तसेच मोबाईल आणि इंटरनेट वापरताना घ्यावयाच्या सुरक्षेच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पन्हाळकर साहेबांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, डिजिटल युगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद लिंक, मेसेज किंवा फोन कॉल आल्यास त्यावर विश्वास न ठेवता त्वरित सायबर सेल किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये नेट लिप आयटी ट्रेनिंग सोल्युशन कंपनीचे ट्रेनर सतिश पवार, गौरव घनदाट, ओंकार पाडोळ यांनी सायबर सुरक्षा,मूलतत्वे,सायबर सुरक्षा संकल्पना,डिजिटल युगातील धोके,नेटवर्क मूलभूत तत्वे,नेटवर्क म्हणजे काय महत्त्वाचे प्रोटोकॉल याबाबत मार्गदर्शन केले.
हॅकिंग,ओटीपी फसवणूक, डिजिटल अरेस्ट,डार्कवेब,अन्वेषण आणि आर्थिक गुन्ह्यांची तपासणी या विषयावर उदाहरणासहित पन्हाळकर साहेबांनी सखोल माहिती दिली.
नवीन सायबर गुन्हे,क्रिप्टो करन्सी डीप फेक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सध्याच्या काळामध्ये डेटा सुरक्षितता,सोशल मीडियावरील काळजी आणि वैयक्तिक उपकरणांचे संरक्षण यावर विद्यार्थ्यांसोबत सामूहिक चर्चा करण्यात आली.माहिती तंत्रज्ञान कायदा,कलम ६७-अ,६७-ब आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार कशी करावी याविषयी देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. इथिकल हॅकिंग हॅकिंग म्हणजे काय,सायबर फॉरेन्सिक टूल्स चा वापर याबाबत मार्गदर्शन केले.
या तीन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी एचडीएफसी बँक क्लस्टर हेड उत्कर्ष अंतुरकर, रोहित तेंडुलकर, नारायणगाव शाखाधिकारी माधुरी चायल, पर्सनल बँकर अल्केश कोकणे तसेच संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,मृणाल डहाळे,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.शरद पारखे तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.


