सामाजिक

सुलोचना माझं नाव… धोलवड माझं गाव – नृत्यसम्राज्ञी सुलोचना नलावडे

1011145503
1011145503

साभार लेख – संजय वसंतराव नलावडे (धोलवड, जुन्नर,मुंबई)

पंचनामा प्रतिनिधी – गण होऊन गवळण सुरु झाली. आठ – दहा गवळणींसह मावशीही मथुरेच्या बाजारला निघाली…अन् नेहमीप्रमाणे श्रीकृष्णाने गवळणींचा मार्ग अडवला. हात जोडले, विनवण्या केल्यानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून गवळणींनी सेवाही केली तरी श्रीकृष्ण रस्ता सोडायला तयार नाही. शेवटी मावशीने विचारले, ‘देवा तुझी सेवा केली तरी आमचा मार्ग सोडत नाहीस.. तुला आणखी काय हवं आहे? यानंतर देवाने, ‘राधेला सेवेसाठी पाचारण करावे’ अशी आज्ञा केली आणि राधा मंचावर प्रवेशकर्ती झाली. यानंतर पुढची बारा तेरा मिनिटं फक्त ढोलकीच्या तालावर एका नखशिखांत लावण्यवतीने गुलाबी चेह-यावर स्मितहास्य ठेवत, दिलखेचक अदाकारीने, नजरेच्या चौफेर कटाक्षाने रसिकमनाचा ठाव घेत अप्रतिम पदन्यास करत रसिक मायबापाला केलेला ‘मुजरा’ उपस्थितांना मंत्रमुग्ध करून जायचा. देहभान हरपलेल्या रसिकांना समोर दिसायची शास्त्रशुद्ध नृत्याविष्कारातून मनोभावे श्रीकृष्णाची सेवा करणारी ‘राधा’ आणि कानाला ऐकू यायचा फक्त ढोलकी, टाळ्या आणि शिट्टयांचा आवाज.

ऐंशीच्या दशकातील दर्दी तमाशा रसिकांना डोळ्यासमोर नक्कीच सुप्रसिद्ध नृत्यांगना सौ. सुलोचना नलावडे धोलवडकर यांची छबी आठवली असेल. नखशिखांत नैसर्गिक सौंदर्य लाभलेली सुलोचना नलावडे ही त्या काळात तमाशा सृष्टीला लाभलेली नृत्यकला निपुण, अभिनयसंपन्न आणि उत्तम गायिका असलेली अतिउत्कृष्ट कलावंत होती. कोकणच्या खेड तालुक्यातील ‘मुरडं’ या छोट्याशा गावातील बळवंतराव आणि केशरबाई या कलावंत दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्येचा जन्म ३० सप्टेंबर १९४५ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच या मुलीचे डोळे (लोचन) अतिशय सुंदर होते म्हणून बळवंतरावांनी तिचे नाव ‘सुलोचना’ असे ठेवले. बळवंतराव खेडकर हे तमाशा सम्राट मा. तुकाराम खेडकर यांचे सख्खे चुलत भाऊ असल्याने लहानपणापासूनच त्यांचाही दशावतारापेक्षा तमाशा कलेकडेच जास्त ओढा होता.

सुरूवातीला १९५२ मध्ये ‘जगताप पाटील पिंपळेकर पार्टी’ आणि त्यानंतर ‘मा. माधवराव नगरकर’ या फडातून हे दाम्पत्य कलेची सेवा करत असे. मुंबईतील लालबागच्या हनुमान थिएटरमध्ये या फडांचे सातत्याने खेळ व्हायचे. तमाशा सुरू झाला की थिएटर मालक नेराळेंचा छोटा ‘मधु’ (मधुकर नेराळे) त्याच्याच वयाची बळवंतरावांची ‘सुलू’ (सुलोचना) आणि इतर कलाकारांची मुलं यांचा एकत्रित लपाछपी, गोट्या असा खेळ रंगत असे. कधी कधी ही लहान मुलं कंटाळून कोणातरी सहकलाकाराच्या मांडीवरच झोपी जायची. फावल्या वेळात तरूण दत्ता महाडिक सुलोचनाला नृत्याचे धडे द्यायचा… ठेका धरायला लावायचा. दहा बारा वर्षांच्या सुलोचनावर नृत्याचे आणि तमाशा कलेचे प्राथमिक संस्कार येथेच झाले. दत्ता महाडिक यांच्या नृत्य शिकवणूकीने सुलोचना चांगली नृत्यांगणा झाली आणि वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी पायात चाळ बांधून बोर्डावर उभीही राहिली. कसदार अभिनय हा अंगभूत गुण आणि गायनाची आवड यामुळे मुंबईत नुकत्याच स्थापन झालेल्या ‘कलाकुंज’ या नाट्यसंस्थेच्या श्रीधर नलावडे यांच्यासारख्या तरूण नाट्यनिर्मात्याला ‘चाळांचा नाद’ या तमाशाप्रधान नाटकासाठी मा. माधवराव नगरकर यांनी सुलोचनाचे नाव सुचवले.

यानंतर सुलोचना, श्रीधर नलावडे आणि कलाकुंज नाट्यसंस्था हे समीकरण पुढची दहा बारा वर्षे मुंबई, पुणेसारख्या शहरांतून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत राहिले. श्रीधर आणि सुलोचना ही ‘चाळांचा नाद’ साठी एकत्र आलेली जोडी, पण यांना एकमेकांच्या ‘ह्रदयाचा नाद’ कधी लागला कळलेच नाही… रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असतानाच हे दोघेही एकमेकांच्या ह्रदयावर कधी विराजमान झाले याचा थांगपत्ता दोघांनाही लागला नाही. ती नृत्य कलेची उपासक, अभिनयात तरबेज, गायनातील कंठकोकिळा, नखशिखांत सौंदर्य लाभलेली, खानदानी तेज असलेली सौंदर्यवती, कोणीही आकर्षित व्हावे अशी लावण्यवती ‘सुलोचना’ आणि तोही कला उपासक, खानदानी श्रीमंत, सरकारी बॅंकेची नोकरी, रूबाबदार, भारदस्त, लोकप्रिय राजबिंडा तरूण ‘श्रीधर’ दोघातही काहीच कमी नाही. प्रेमाच्या अनुकूलतेला कशाचीही तमा नसते, कोणाचीही परवानगी लागत नाही. सन १९६२ मध्ये विद्याविहार येथे एका जवळच्या मित्राच्या घरी वैदिक पद्धतीने दोघांनी स्वतःला विवाह बंधनात बांधून घेतले.

आता ख-या अर्थाने ‘कलाकुंज’ नाट्यसंस्था सशक्त झाली होती. सुलोचनाने तमाशा क्षेत्र सोडले. चाळांचा नाद पाठोपाठ माझ्या जाळ्यात घावलायं मासा, हरबाची पारू, नथीतून मारला तीर, राहूने गिळली चंद्रकोर अशा एकामागोमाग एक दर्जेदार निर्मिती ‘कलाकुंज’ संस्थेने सादर केल्या. यादरम्यान सुलोचनाला १९६५ मध्ये एक मुलगाही झाला. मराठी नाट्यसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिले जात होते. सुलोचनाला इतर निर्मात्यांकडूनही चागलीच मागणी येऊ लागली होती. श्रीधररावांचे थोरले बंधू गुलाबराव हे राष्ट्रीय मिल मजदूर संघात कार्यरत असताना तिथे शाहीर दादा कोंडके यांचे ‘जनता कला पथक’ चांगलेच लोकप्रिय झाले होते. यातूनच पुढे गुलाबराव एके दिवशी शाहीर दादा कोंडके यांना ‘हरबाची पारु’ हा प्रयोग पाहण्यासाठी घेऊन आले. सुलोचनाचं काम पाहून दादांनी त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी विचारणा केली. दादांबरोबर सुलोचनाने ‘विच्छा माझी पुरी करा’ चे महाराष्ट्राभर शेकडो प्रयोग केले. शाहीर दादा कोंडके आणि सुलोचना नलावडे यांनी स्वतः गाऊन सादर केलेली एक तासाची ‘मुंबईची लावणी’ त्या काळात फारच लोकप्रिय झाली होती.

सिनेअभिनेत्री मधु कांबीकर यांच्याबरोबर सुलोचना नलावडे यांनी ‘बाईचा चटका उडवला पटका’ चे हजारांहून अधिक प्रयोग तर केलेच पण लावण्यांचेही अनेक शो केले. त्या काळात हिंदी – मराठी सिने अभिनेत्रींचे फोटो असलेली कॅलेंडर अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहीरात करण्यासाठी प्रकाशित करत असत. एका कॅप्सूल कंपनीने नृत्यसम्राज्ञी सुलोचना नलावडे यांचे बारा वेगवेगळे फोटो असलेले कॅलेंडर प्रकाशित केले होते. अभिनेत्री मुमताज, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्या बाजूला घरोघरी सुलोचना नलावडे यांचेही कॅलेंडर रूबाबत झळकत होते. हे फोटो पुढे अभिनेता म्हणून प्रसिध्द झालेले ‘राजा मयेकर’ यांनी काढले होते. यावरून सुलोचना नलावडे या नावाची लोकप्रियता काय असेल याची कल्पना येते. ‘गाढवाचं लग्न’ फेम प्रभाताई शिवणेकर काही कारणास्तव या प्रयोगातून दूर झाल्यानंतर वगसम्राट दादू इंदुरीकर यांना त्यांची जागा घेणारी एकमेव सशक्त अभिनेत्री दिसली ती म्हणजे ‘सुलोचना नलावडे’ होय. सुलोचना नलावडे यांनी साकारलेली ‘गंगी’ आणि अफलातून दादू इंदुरीकर यांची केमिस्ट्री त्यांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी देऊन गेली.

वसंत सबनीस यांनी सुलोचनाला घेऊन ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’ याचे चार – पाचशे प्रयोग महाराष्ट्राच्या छोट्या मोट्या शहरात हाऊसफुल्लचा बोर्ड लावून केले. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या निधनानंतर मधु कडू यांच्याबरोबर सुलोचना आणि श्रीधर या दोघांनीही ‘गाढवाचं लग्न’ चे पाचशेवर प्रयोग केले. एकदा जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील समारंभात ‘महाराष्ट्राची लावणी’ हा कार्यक्रम सादर होत असताना हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध लोकप्रिय कॅबरे डान्सर ‘हेलन’ उपस्थित होती. सुलोचनाने अशी काही बहारदार, नजाकतभरी लावणी सादर केली की… तिची पावले त्या दिवशी जमिनीवर टेकलीच नाहीत. हेलन फक्त एकटक सुलोचनाच्या पायांकडे पहात होती. लावणी संपताच ही कॅबरे सम्राज्ञी उठून उभी राहिली, मंचावर जाऊन सुलोचनाच्या पायावर शंभर रूपयांची नोट ठेवली आणि तिला घट्ट मिठी मारली. एका अमराठी नृत्यसम्राज्ञीने एका मराठी लावणी नृत्य कलावतीचा केलेला तो सर्वात मोठा बहुमान होता. कोणत्याही कलावंतासाठी असा क्षण म्हणजे ‘सुवर्ण क्षण’ असतो.

माया जाधव आणि शहाजी काळे ही आणखी एक नावाजलेली जोडी त्यावेळी लोकप्रिय होती. या जोडीबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री लता अरुण या शहाजी काळे यांच्या भगिनी लवंगी मिरची कोल्हापूरची, सोळावं वरीस धोक्याचं, कोंबडीशिवाय उरूस अशा अनेक प्रयोगात होत्या. परंतु अनेकदा त्यांच्या व्यस्ततेमुळे किंवा शुटिंगमुळे प्रयोग रद्द करावा लागत असे. यावर उपाय म्हणून लता अरुण यांच्या अनुपस्थितीत सुलोचना या प्रयोगांमधून काम करू लागली आणि हळुहळू हे सर्व प्रयोग कमालीचे यशस्वी होत गेले. सुलोचना आणि माया जाधव या दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी झाल्या. या दोघींनी मिळून बारा तेरा मिनिटांचा फक्त ढोलकीच्या तालावर एक ‘मुजरा’ बसविला होता. सुलोचना नलावडे या नावाची लोकप्रियता अशी चौफेर शिगेला पोहोचली असताना दादा कोंडके यांनी ‘सोंगाड्या’ या चित्रपटाची निर्मिती करताना त्यातील मुख्य स्त्री भूमिकेसाठी सुलोचना नलावडे यांना विचारणा केली. परंतु पुढील दिड-दोन वर्षांपर्यंतच्या तारखांचे वेळापत्रक व्यस्त असल्याने नकार देण्याशिवाय पर्याय नव्हता.

यानंतर काही वर्षांनी ‘लावणी झाली गं रागिणी’ या आणखी एका मराठी चित्रपटाचे सिनेअभिनेत्री जयश्री टी. यांच्याबरोबर सुलोचना नलावडे यांना घेऊन संपूर्ण शुटींग झाले परंतु आजतागायत हा सिनेमा पडद्यावर कधीच झळकला नाही…हे दूर्दैव! यानंतर श्रीधरराव नलावडे यांनी १९७२ साली ‘शिवनेर लोकनाट्य मंडळ’ स्थापन केले आणि या मंडळाच्या सौजन्याने चैत्र महिन्यात ‘श्रीधरराव धोलवडकर सह सुलोचना नलावडे’ हा स्वतःचा तमाशा फड सुरू केला. अल्पावधीतच हा तमाशा फड खेडोपाडी लोकप्रियही झाला. सुलोचना आणि श्रीधरराव ही मुंबईची नामांकित जोडी पाहण्यासाठी रसिक या तमाशाला आवर्जून उपस्थित रहात. किसन खंडागळे या पट्टीच्या ढोलकीपटूच्या जबरदस्त ढोलकी वादनावर सुलोचनाने सादर केलेला अप्रतिम ‘मुजरा’ हे या तमाशाचे बलस्थान होते. तमाशात ‘मुजरा’ हा प्रकार सुलोचना नलावडे यांनी रूढ केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. धोलवड येथील मळगंगा माता यात्रेत दोन दिवस हा तमाशा असायचा तेंव्हा दिवसासुद्धा सुलोचनाची एक झलक पहायला मिळावी यासाठी अनेकजण घराभोवती जमायचे. ‘सुलोचना माझं नाव.. धोलवड माझं गाव’ हे गाणं सुलोचना अभिमानाने म्हणायची.

दरवर्षी चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगाव येथे या तमाशाची राहूटी पडायची आणि त्याच दिवशी श्रीधररावांचे धाकटे बंधू भागवताचार्य ह.भ.प. सुमंतमहाराज नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली धोलवडला रामनवमी सप्ताह सुरू व्हायचा. सुलोचनाबाईंना हे माहित झाल्यानंतर त्या अनेकदा श्रीधररावांकडे, ‘मला बाबांचे किर्तन ऐकायचे आहे’ असा हट्ट करत असत. मग बाबांच्या किर्तनाच्या दिवशी तमाशाची सुपारी नसेल तर सुमंतमहाराजांचं किर्तन ऐकण्यासाठी तमाशाची गाडी धोलवडला सप्ताह मंडपाच्या बाहेर येऊन उभी रहायची. इतरांना व्यत्यय होऊ नये म्हणून घराबाहेर ओट्यावर बसून सुलोचनाबाई किर्तन श्रवणाचा लाभ घेत. सुमंतमहाराजही रंगात आले की,’आज आतून किर्तन वरुन तमाशा आहे’ असा मार्मिक विनोद करायचे. असा दुर्मिळ योगायोग तीन चार वेळा जमून आला होता. त्यावेळी फारशी महत्वाची न वाटलेली ही घटना आज मात्र सुलोचनाबाईंचं मोठेपण अधोरेखित करून जाते. एक ‘नर्तकी किर्तन’ ऐकण्यात रममाण होऊन जायची. एक लावणी सम्राज्ञी किर्तनकार महाराजांच्या दरबारात ध्यानस्थ होऊन अध्यायत्म अमृत प्राशन करायची. हा सर्व १९८० पर्यंतचा काळ सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील सुवर्ण काळ म्हणता येईल.

परंतु इथून पुढे श्रीधरराव आणि सुलोचना या एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जोडीला अतिशय खडतर आयुष्याला सामोरे जावे लागले. या तमाशा फडाला पहिल्या दिवसापासूनच अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. त्यातच हा तमाशा फड पुर्णपणे तोट्यात गेला. श्रीधररावांना उच्च रक्तदाब आणि मधूमेहासारख्या व्याधींनी घेरले आणि त्यातच त्यांचे १९८६ साली निधन झाले. संकटं एकटी येत नाहीत. सुलोचनाबाईंचा अवघा तेवीस वर्षे वयाचा मुलगाही आकस्मिकपणे हे जग सोडून गेला. सुलोचनाबाई आणि मुलगी वृंदा यांना या धक्क्यातून सावरणे कठीण झाले. नैराश्यामुळे काम करणे अशक्य झाले. परंतु अशा कठीण प्रसंगातही आनंद हडशीकर आणि बबनराव हडशीकर यांनी सुलोचनाबाईंना आधार दिला, त्यांना सर्वोतोपरी मदत केली.

काही कालावधीनंतर संभाजी डोणे हा ढोलकीपटू सुलोचनाबाईंना मा. पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्याकडे घेऊन गेला. त्यानंतर मात्र सुलोचनाबाईं बोर्डावर पुन्हा खंबीरपणे उभ्या राहिल्या. परंतु नृत्य करणे त्यांनी थांबवले होते. फक्त गायन आणि वगनाट्यात भूमिका एवढंच काम त्या करत असत. परंतु या दरम्यान आणखी एक कठोर निर्णय सुलोचनाबाईंना घ्यावा लागला. स्वतःची इच्छा नसतानाही आपले सोडलेले चाळ त्यांना आपल्या मुलीच्या पायात बांधावे लागले. मुलगी वृंदा हीच आता त्यांचा आधार होती. कालपरत्वे जखमा भरल्या नाहीत पण सुकून मात्र नक्की गेल्या. मा. पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्यानंतर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर, मा. चंद्रकांत ढवळपुरीकर या तमाशा फडातूनही सुलोचनाबाईंनी अभिनय आणि गायन केले. खरंतर आता या सर्व फडांचा कारभार या फड मालकांच्या मुलांच्या हातात आला होता. पण त्यांनीही सुलोचनाबाईंचं ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व मान्य करून त्यांना यथोचित आदर आणि प्रतिष्ठा देण्याचा मनापासून प्रयत्न केला. परंतु २०१४ मध्ये मात्र तमाशा कला आणि रसिकांची पंचावन्न वर्षांची प्रदीर्घ सेवा करून ही नृत्यसम्राज्ञी बोर्डावरून सन्मानाने निवृत्त झाली.

तमाशा कला क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाने ‘विठाबाई नारायणगावकर स्मृती लोककला जीवन गौरव पुरस्कार – २००७’ हा मानाचा शासकीय पुरस्कार सुलोचना नलावडे यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा तत्कालीन मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांचे शुभहस्ते संपन्न होणार होता. परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत तरीसुद्धा ज्येष्ठ मंत्री महोदय मा. गणेशजी नाईक, मा. जगजीतसिंग राणा आणि सिनेअभिनेत्री जयश्री टी. आवर्जून उपस्थित राहिले. याच दिवशी रात्री दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर समीरन वाळवेकर यांनी सुलोचना नलावडे यांची थेट मुलाखत घेतली. लावणीसम्राज्ञी ‘लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार – २००३’ शुभहस्ते डाॅ. श्रीराम लागू आणि सिनेअभिनेत्री मधु कांबीकर, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय आयोजित स्पर्धेत ‘विक्रमराजाची पुण्यनगरी अर्थात शनिमहात्म्य’ या वगनाट्यातील गायनासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुलोचना नलावडे यांना मिळाले होते. साईकृपा पतसंस्था आणि वैष्णवी मल्टीस्टेट बेल्हा यांचेकडून संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर सन्मान पत्र – २०१६ तमाशा महोत्सवात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. रेनवडी ग्रामस्थांनीही सुलोचना नलावडे यांना ‘गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. पिपल्स आर्ट सेंटर, मुंबई या संस्थेने दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी सुलोचनाबाई नलावडे यांना सह्याद्री यशप्राप्ती पुरस्कार – २०२३’ या पुरस्काराने सन्मानीत केले होते. हा पुरस्कार त्यांच्या जीवनातील अखेरचा पुरस्कार होता आणि माझ्यासाठीही हा दिवस खूप खास होता. कारण याच समारंभात माझ्या जुन्नरच्या साहित्यिकीय उपक्रमासाठी मला सुद्धा ‘सह्याद्री यशप्राप्ती पुरस्कार – २०२३’ देण्यात आला होता आणि असे दोन पुरस्कार आमच्या नलावडे परिवाराला एकाच मंचावर मिळाले होते. सुलोचनाबाई नलावडे यांच्याबरोबर पुरस्कार स्विकारणे हे माझे फार मोठे सौभाग्य होते.

असा संघर्षमय पण गौरवशाली जीवनप्रवास असलेली ही कलातपस्वीनी सुलोचना नलावडे म्हणजे तमाशाच्या सुवर्णकाळाची साक्षीदार, तमाशाचा चालता बोलता इतिहास होय‌. अशी ही आयुष्यातील आणि तमाशा क्षेत्रातील अनेक चढ-उतार अनुभवलेली, आता सतत वाचनात दंग असणारी कला तेजस्विनी आपली मुलगी, नातु, नातसून यांच्यासह आनंदाने आयुष्यातील ‘सन्मानाची संध्याकाळ’ व्यतीत करीत आहे.

ग्रंथाली प्रकाशित ‘शिवनेरीची श्रीमंती’ या गाजलेल्या पुस्तकातून–

विशेष सूचना ~ ही पोस्ट शेअर करताना मूळ लेखकाच्या नावासह शेअर करावी… इतर कोणाचे नाव काॅपी पेस्ट करू नये..अन्यथा कारवाई केली जाईल.

          ~ लेखक ~
  संजय वसंतराव नलावडे
    धोलवड, जुन्नर (मुंबई)
 मोबाइल - ९१६७९३७०४०

‘निसर्गरम्य जुन्नर – भूमी गुणिजनांची’

1011111248

Related posts

धामणी (लोणी) येथे १५ जून रोजी संपन्न होणार सोमवती शाहीस्नान सोहळा !!

Chief Editor

शिरदाळे येथे शनिवारी संपन्न होणार दक्षिणमुखी हनुमान भंडारा सोहळा !!

Chief Editor

धामणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भक्तीबरोबरच सामाजिक सेवेचा जागर

Chief Editor

Leave a Comment