
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज, बेल्हे (बांगरवाडी), ता. जुन्नर येथे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेतील व्यावसायिक नीतिमत्ता, न्यायालयीन शिस्त आणि कायदेविषयक जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने ‘व्यावसायिक नीतिशास्त्र आणि न्यायालय अवमान कायदा’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. पुणे येथील निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. सोपान निकम यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कवडे, ॲड. सुधीर कोकाटे, ॲड. अभिषेक भागवत, श्री. हरिओम ब्रह्मे, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रा. शिवाजी कुमकर तसेच समर्थ लॉ कॉलेजमधील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
कायद्याच्या क्षेत्रात केवळ कायद्याचे पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, त्यासोबत व्यावसायिक नीतिमत्ता, न्यायालयीन शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि आपल्या कर्तव्यांची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री.निकम यांनी केले. वकिली हा केवळ व्यवसाय नसून न्यायव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वकिलांनी न्यायालयीन प्रक्रियेत आपली भूमिका जबाबदारीने आणि नैतिक मूल्यांचे पालन करून पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. सुनील कवडे यांनी वकिलांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, न्यायालयीन शिस्त, न्यायालयीन कामकाजातील आचारसंहिता, न्यायालयाचा अवमान कायदा तसेच न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचे संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. न्यायालयीन कामकाजामध्ये प्रत्येक कृतीचा न्यायव्यवस्थेवर परिणाम होत असतो.त्यामुळे कायद्याच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात न्यायालयीन क्षेत्रात काम करताना कायद्याचे पालन करण्याबरोबरच न्यायालयाचा सन्मान आणि व्यावसायिक आचारसंहितेचे भान ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले की कायद्याचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी विविध कायद्यांचा सखोल अभ्यास करण्यासोबतच सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त, संयम, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्ये आत्मसात करावीत.भावी वकील, न्यायाधीश अथवा कायदेविषयक क्षेत्रातील व्यावसायिक म्हणून कार्य करताना समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याचा सकारात्मक आणि जबाबदारीने वापर करण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. सचिन दरेकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत व्याख्यानाच्या उद्देशाची माहिती दिली. प्रा. गौरी लोखंडे यांनी उपस्थित मान्यवर, प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.


