
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावाला आज सायंकाळी 4.30 वाजता ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढले आहे. विशेष म्हणजे जारकरवाडी वगळता लगतच्या परिसरात किरकोळ स्वरूपात पाऊस झाला आहे. या पावसात निवृत्त मुख्याध्यापक श्री.निवृत्ती पाटीलबुवा पाचपुते यांच्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे.

पाचपुते कुटुंबाच्या घराच्या पश्चिम बाजूने डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची वितरिका गेली आहे. संबंधित विभागाला वारंवार विनंती करूनही त्यांनी या वितरिकेतील वाढलेले गवत, झाडे झुडपे न काढल्याने सदर वितरिका तुंबली आणि त्या वितरिकेचे तुंबलेले पाणी वितरिका फुटून थेट पाचपुते कुटुंबाच्या घरात घुसले. ज्यामुळे पाचपुते कुटुंबाचे वर्षभर पुरेल इतके अन्न धान्य, भूईमुग शेंगा, जनावरांचा चारा, त्यांचे स्वतःचे उत्पादन असणारे गावठी तूप या सर्व बाबींचे अतोनात नुकसान झाले आहे.

संबंधित विभागाने या वितरिकेची त्वरित दुरुस्ती करून पाचपुते कुटुंबाचे झालेले नुकसान व त्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जारकरवाडी गावाचे मा.उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली आहे.




