
पंचनामा प्रतिनिधी – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना साखर वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. २) साखर वाटप करण्यात आले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी कारखाना प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार संबंधित गावांमध्ये साखरेचे वाटप केले जाणार आहे. काही कारणास्तव गावामध्ये साखर घेता न आलेल्या सभासद व ऊस उत्पादकांसाठी कारखाना कार्यस्थळावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील तसेच संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
पोंदेवाडी येथे साखर वाटपावेळी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, आनंदा पोंदे आदी उपस्थित होते.
सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना निर्धारित वेळेत साखर मिळावी, यासाठी कारखाना प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून, जाहीर वेळापत्रकानुसार साखर वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.


