
निरोगी भविष्यासाठी फार्मासिस्टचे सक्षमीकरण’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची जनजागृती !!
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे (बांगरवाडी), येथे जागतिक फार्मासिस्ट दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) यांनी यंदाची ‘निरोगी भविष्यासाठी फार्मासिस्टचे सक्षमीकरण’ ही संकल्पना जाहीर केली असून, या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी व्यवसायाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापकांच्या स्वागतपर मनोगताने झाली. त्यानंतर जागतिक फार्मासिस्ट दिनाची संकल्पना, उद्देश आणि फार्मसी व्यवसायातील बदलत्या भूमिकेचे महत्त्व याबाबत माहितीपूर्ण सत्र घेण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी फार्मासिस्ट शपथ घेतली. नैतिक फार्मसी व्यवसायाच्या माध्यमातून रुग्णसेवा आणि मानवतेची सेवा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी आरोग्यसेवा, औषधनिर्माण उद्योग, संशोधन तसेच सामुदायिक आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये फार्मासिस्टची बदलती भूमिका स्पष्ट केली. औषधांचे वितरण करण्यापुरती फार्मासिस्टची भूमिका मर्यादित नसून, रुग्णांच्या सुरक्षिततेपासून औषधांविषयी योग्य मार्गदर्शनापर्यंत फार्मासिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी सांगितले.
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रील बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘रुग्ण सुरक्षेमध्ये फार्मासिस्टची भूमिका’, ‘स्वतःहून औषध घेण्यास नकार द्या’, ‘करिअर म्हणून फार्मसी—औषध वितरणापलीकडे’ तसेच ‘निरोगी भविष्यासाठी फार्मासिस्टचे सक्षमीकरण’ अशा विविध विषयांवर जनजागृतीपर रील्स तयार केल्या.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी फार्मसीविषयक ज्ञानाला डिजिटल माध्यमातील सर्जनशीलतेची जोड देत समाजात आरोग्यविषयक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. उत्कृष्ट रील्सची निवड करून संबंधित विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. डॉ. महेश भास्कर व डॉ. शशिकांत ताजणे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी गायकवाड यांनी केले, तर डॉ. बिपिन गांधी यांनी आभार मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बी. फार्म. व डी. फार्म.च्या विद्यार्थ्यांच्या समन्वयातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.


