
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. “योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समन्वय” या संकल्पनेला साकार करत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
या उपक्रमात संकुलातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांसह ५५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संपूर्ण विद्यालय परिसर योगमय झाला होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, योगासनांमधील एकाग्रता आणि शिस्तबद्ध सहभाग यामुळे भारतीय संस्कृतीचा अभिमान सर्वांना अनुभवता आला.
कार्यक्रमाचे आयोजन समर्थ कॅम्पसचे क्रीडा संचालक मा. श्री. हरिश्चंद्र नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच सुपरवायझर सखाराम मातेले यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून यशस्वी अंमलबजावणी केली.
योगदिनानिमित्त क्रीडा शिक्षक विनायक वऱ्हाडी व सुरेश काकडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगप्रकारांचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये सूर्यनमस्कार, उभी व बैठी योगासने, तसेच पोटावर झोपून केली जाणारी विविध योगासने यांचा समावेश होता.
योगाच्या प्रत्येक कृतीमधून आत्मविश्वास, एकाग्रता, मानसिक स्थैर्य आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचे महत्त्व अधोरेखित झाले. प्रशिक्षकांनी नियमित योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि जीवनशैली अधिक निरोगी बनते, असे सांगितले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनशैली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित योगाभ्यास करून आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम ठेवले पाहिजे. आधुनिक युगातील ताणतणावावर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.”
कार्यक्रमास कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत योगाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व आरोग्यदायी जीवनमूल्ये जपण्याचे आवाहन केले.
या योगदिन उपक्रमामुळे संपूर्ण समर्थ गुरुकुल परिसर आरोग्य, सकारात्मकता आणि ऊर्जेने भारावून गेला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्यदायी जीवनशैलीचे संस्कार रुजविण्याचा विद्यालयाचा प्रयत्न या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाला.
“योग करा – निरोगी रहा, योग जगा – आनंदी रहा” हा संदेश देत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.





