
पंचनामा प्रतिनिधी | जारकरवाडी
जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी पूर्ण झाली असून, ग्रामदैवत आई वडजादेवी व बिरोबा महाराज मंदिर परिसरात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात कीर्तन सोहळा रंगणार असून, ग्रामस्थांच्या एकजुटीतून उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावातील सर्व ग्रामस्थ तन-मन-धनाने या उत्सवात सहभागी होतात.

नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी महिला भगिनींसाठी महाआरतीचे आयोजन करण्यात येते. तसेच होम-हवन, दुर्गापूजा यांसारखे धार्मिक विधी पार पडतात. महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे महिलांचा उत्सवातील सहभाग वाढतो, तसेच गावातील सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. गावातील तरुण सहकाऱ्यांनी पुढाकार घेत उत्सवाचे नियोजन केले आहे.

दसऱ्याला बारा गाड्या ओढण्याची परंपरा
जारकरवाडी गावाला धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभला आहे.नवरात्रोत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने होते. या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असून, ग्रामस्थांमध्ये त्याबाबत उत्सुकता असते.


प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याची आख्यायिका
जारकरवाडी परिसराला प्राचीन धार्मिक वारसा असल्याची मान्यता आहे. प्रभू रामचंद्र व सीतामाई वनवासात असताना त्यांनी काही काळ या गावात वास्तव्य केल्याची आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते. गावातील पांडुरंग मंदिर परिसरात प्राचीन लेणी असल्याचे दिसून येते. मंदिराच्या पुढील भागात उत्खननादरम्यान अर्धवट उत्खनन झाल्यासारखा भागही दिसून येतो. या परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वाचा अभ्यास झाल्यास गावाच्या प्राचीन वारशावर अधिक प्रकाश पडू शकतो.

एकीच्या बळावर गावाचा विकास
जारकरवाडीतील ग्रामस्थांनी एकजुटीच्या बळावर गावाच्या विकासासाठी विविध प्रयत्न केले आहेत. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे गावातील शेतीला पाण्याची उपलब्धता होऊन बारमाही बागायती पिके घेतली जातात. धार्मिक परंपरा जपत सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्याचे काम ग्रामस्थ करत आहेत. यंदाचा नवरात्रोत्सवही सर्वांच्या सहभागातून उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी तरुण मंडळींसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.



