
प्रतिनिधी -समीर गोरडे
पंचनामा प्रतिनिधी जुन्नर – पुणे जिल्हा परिषद आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विकास प्रबोधिनी, जुन्नर येथे ‘प्रज्ञा विकास कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले.

मागील वर्षी ISRO व NASA यांच्या निवड चाचणीतील मुलाखतीसाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि प्रेरणा जागृती निर्माण करणे, तसेच त्यांच्या विशेष क्षमता ओळखून योग्य दिशा देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ. ललिता दहितुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे अधिकारी श्री. अशोक लांडे, पुणे मॉडेल स्कूलचे समन्वयक-सल्लागार श्री. सिद्धार्थ चव्हाण आणि साने गुरुजी कथामालेचे श्री. बाळासाहेब कानडे उपस्थित होते.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांच्या विकासातील अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग आणि कृती-आधारित उपक्रम घेण्यात आले. ज्ञान प्रबोधिनी, पुणेचे श्री. प्रकाश रणनवरे, श्री. सिद्धेश पवार, श्री. शुभंकर केळकर, सौ. अमृता देसाई आणि कु. सई मेहता यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषद फेलो कु. अस्मिता आल्हाट यांनी नियोजनात सहकार्य केले. कार्यशाळेसाठी आदिवासी विकास प्रबोधिनीचे विश्वस्त श्री. तानाजी तळपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार पुणे मॉडेल स्कूलचे सहायक श्री. उमेश धुमाळ यांनी मानले.


