सामाजिक

दीपमाळ गावाच्या वैभवाचे प्रतीक ; धामणीत लोकसहभागातून तीन दगडी दीपमाळा उभारण्याचा संकल्प; दुसऱ्या दीपमाळेच्या कामाचा शुभारंभ !!

1011143284
1011143284

पंचनामा प्रतिनिधी – दीपमाळ ही मंदिराची केवळ शोभा वाढविणारी वास्तू नसून, ती गावाच्या धार्मिक श्रद्धेचे, सांस्कृतिक परंपरेचे आणि ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक आहे. मंदिराच्या परिसरात उभी असलेली दीपमाळ श्रद्धेचा प्रकाश सर्वदूर पोहोचविण्याचा संदेश देते. त्यामुळे दीपमाळ ही गावाची, वाडीची आणि जागृत देवस्थानाच्या वास्तुकलेची तसेच संपन्न परंपरेची साक्ष देणारी वास्तू असल्याचे प्रतिपादन समाजप्रबोधनकार संतोष महाराज बढेकर यांनी केले.

धामणी (ता. आंबेगाव) येथील म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरातील ‘मार्तंड’ महाद्वारासमोर उभारण्यात येणाऱ्या नवीन दगडी दीपमाळेच्या कामाचा शुभारंभ संतोष महाराज बढेकर आणि वाशी मार्केटचे व्यापारी बाळासाहेब ज्ञानेश्वर बढेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बढेकर बोलत होते.

श्रद्धा आणि प्रकाशाचे प्रतीक

महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकलेमध्ये दीपमाळेला विशेष स्थान आहे. मंदिराच्या प्रांगणात किंवा प्रवेशद्वारासमोर उभारली जाणारी दीपमाळ धार्मिक उत्सव, सण आणि विविध धार्मिक विधींच्या वेळी दिव्यांनी उजळून निघते. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारी दीपमाळ ही भारतीय संस्कृतीतील ज्ञान, श्रद्धा, सकारात्मकता आणि आध्यात्मिक प्रकाशाचे प्रतीक मानली जाते.

पूर्वीच्या काळात नवसपूर्तीनंतर अथवा देवाला केलेल्या संकल्पाची इच्छापूर्ती झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरासमोर दीपमाळ उभारण्याची प्रथा होती. त्यामुळे दीपमाळ ही भक्ताच्या श्रद्धेची आणि देवाप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेची साक्षही मानली जाते. दीपमाळीवरील प्रत्येक दिवा हा भक्तीचा प्रकाश आणि सामूहिक श्रद्धेचे प्रतीक म्हणून पाहिला जातो.

वास्तुकलेचा ठेवा

दगडात कोरलेल्या दीपमाळांची रचना ही महाराष्ट्राच्या पारंपरिक शिल्पकलेचा आणि स्थापत्यकलेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. दीपमाळीची उंची, तिची रचना, दिवे ठेवण्यासाठी केलेले कोनाडे आणि कलात्मक बांधणी मंदिराच्या वास्तूला वेगळे सौंदर्य प्राप्त करून देतात. त्यामुळे अशा दीपमाळांचे जतन करणे म्हणजे केवळ धार्मिक परंपरा जपणे नव्हे, तर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला वास्तुकलेचा वारसाही पुढील पिढीकडे सुपूर्द करणे होय.

धामणीकर ग्रामस्थांनी लोकसहभागातून तीन दगडी दीपमाळा उभारण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम धार्मिक श्रद्धेसोबतच गावातील एकोपा आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण असल्याचे संतोष महाराज बढेकर यांनी सांगितले.

1011143282

खंडोबा मंदिरासमोरील पहिल्या दीपमाळेचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, दुसऱ्या दगडी दीपमाळेच्या बांधकामाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. या दीपमाळांमुळे देवस्थान परिसराच्या धार्मिक आणि वास्तुशिल्पीय वैभवात भर पडणार आहे.

यावेळी देवस्थान जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव, सेवेकरी दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, प्रभाकर भगत, रामदास बो-हाडे, प्रमोद देखणे, सुरेश बढेकर, मच्छिंद्र रोकडे आणि राजेंद्र सरडे उपस्थित होते.

1011111248

Related posts

डिजिटल युगातही हाताने साकारलेल्या चित्रकलेची ओढ कायम ; पारगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र साकारले !!

Chief Editor

“शिवकन्या रेशमा कुटे यांना ‘पहिली आयर्नमॅन महिला’ होण्याचा बहुमान” !!

Chief Editor

“नवीन स्वप्नांना नवी दिशा, नव्या वाटचालीला नवी आशा”; समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत !!

Chief Editor

Leave a Comment