सामाजिक

समर्थ क्रीडा संकुलात जुन्नर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न !!

1011140279

१८४ मुला-मुलींच्या संघांचा उत्स्फूर्त सहभाग ;विजेत्या संघांचा सन्मान !!

पंचनामा प्रतिनिधी – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना तसेच समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बांगरवाडी-बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा समर्थ क्रीडा संकुल, बेल्हे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

या स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील शाळांमधील १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील १८४ मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला. विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट सांघिक खेळ, चपळता, आक्रमकता, बचाव कौशल्य, शिस्त आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन घडविले. स्पर्धेच्या निमित्ताने समर्थ क्रीडा संकुलात दिवसभर क्रीडाप्रेमी, विद्यार्थी, क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर आणि समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करावी, असे आवाहन केले. क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही महत्त्व द्यावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

विविध वयोगटांतील विजेते संघ

१४ वर्षे मुले :
प्रथम क्रमांक – गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालय, नारायणगाव
द्वितीय क्रमांक – शिवनेरी स्कूल, आर्वी
१७ वर्षे मुले :
प्रथम क्रमांक – गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालय, नारायणगाव
द्वितीय क्रमांक – समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे
१९ वर्षे मुले :
प्रथम क्रमांक – छत्रपती ज्युनिअर कॉलेज, जुन्नर
द्वितीय क्रमांक – समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे
१४ वर्षे मुली :
प्रथम क्रमांक – माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी
द्वितीय क्रमांक – चैतन्य विद्यालय, ओतूर
१७ वर्षे मुली :
प्रथम क्रमांक – ज्ञानमंदिर हायस्कूल, आळे
द्वितीय क्रमांक – शंकरराव बुट्टे पाटील हायस्कूल, जुन्नर
१९ वर्षे मुली :
प्रथम क्रमांक – गुरुवर्य रा. प. सबनीस ज्यु. कॉलेज, नारायणगाव.
द्वितीय क्रमांक – शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना संस्थेचे सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते समर्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी खेळाडूंचे कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तालुकास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संघाना पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी आयोजकांकडून विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांचे सहकार्य - स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी आणि आश्विनी जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहभागी सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, पंच, स्वयंसेवक आणि खेळाडूंनी दिलेल्या सहकार्यामुळे स्पर्धा नियोजनबद्ध व सुरळीतपणे पार पडल्या.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, जुन्नर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत यांच्या वतीने सर्व आयोजक, क्रीडा शिक्षक, पंच, सहभागी शाळा, प्रशिक्षक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. तसेच विजेत्या संघांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
1011111248

Related posts

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील पांडूरंग महादू वाळूंज यांच्या शेतातील डिपी व विद्युत खांब त्वरीत हटवण्याची मागणी !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील पुलावर अपघाताचा धोका;घोड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक सूचना फलक बसवा – मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांची मागणी!!

Chief Editor

पारगावमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी!

Chief Editor

Leave a Comment