
पंचनामा विशेष – गेल्या काही दिवसांत माध्यमांमधून समोर आलेली एक अत्यंत चिंताजनक घटना संपूर्ण वन्यजीव संवर्धन क्षेत्राला हादरवून सोडणारी ठरली. पेंच आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पातील एका मादी वाघासह चार बछड्यांचा मृत्यू झाला आणि शवविच्छेदनानंतर त्यांना Canine Distemper Virus (CDV) ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
ही केवळ एका व्याघ्र कुटुंबाची हानी नाही, तर आपल्या संपूर्ण वन्यजीव परिसंस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.
Canine Distemper हा मुख्यतः श्वान कुळातील ( Canidae ) प्राण्यांमध्ये आढळणारा अत्यंत घातक विषाणू आहे. मात्र आता हा विषाणू मांजर कुळातील ( Feline ) प्राण्यांपर्यंत, अगदी वाघांसारख्या सर्वोच्च शिकाऱ्यांपर्यंत पोहोचू लागला आहे. यामुळे वनविभाग, NTCA आणि संवर्धन संस्थांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कारण वाघ हा केवळ वन्यप्राणी नसून भारताच्या जैववैविध्याचा आणि अस्मितेचा प्रतीक आहे.
परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ही समस्या नवीन नाही.
सन २०२२ मध्ये दौंड तालुक्यातील दंडवाडी परिसरात पाच लांडग्यांचा मृत्यू याच CDV मुळे झाला होता. त्यातील एका पिल्लाला RESQ पथकाच्या माध्यमातून उपचारासाठी आणण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीत CDV ची पुष्टी झाली. त्यानंतर सासवड, पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर परिसरातही या विषाणूचा प्रसार झाल्याचे स्पष्ट झाले. बघता बघता तब्बल १२ ते १३ लांडगे मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

मी अनेक वर्षांपासून वन्यप्राणी बचाव आणि जनजागृती कार्यात कार्यरत असून पुणे जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अनेक वन्यप्राण्यांमध्ये या विषाणूची लक्षणे आणि संसर्ग प्रत्यक्ष पाहिला आहे. पण त्या वेळी या समस्येकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही.
आज हा विषाणू वाघांपर्यंत पोहोचल्यावर मात्र संपूर्ण यंत्रणा जागी झालेली दिसत आहे.
वनक्षेत्रांमध्ये वाढणारी भटक्या कुत्र्यांची संख्या ही आजची सर्वात मोठी आणि दुर्लक्षित समस्या बनली आहे . व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये आणि राखीव वनक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचा मुक्त वावर दिसून येतो. बारामतीजवळील मयुरेश्वर अभयारण्य तसेच कर्जतजवळील रेहेकुरी संवर्धन क्षेत्रात 30 हून अधिक कुत्रे आढळून येतात.

ही बाब केवळ चिंताजनक नाही, तर वन्यजीवांसाठी थेट जीवघेणी ठरत आहे.विशेषतः गवताळ परिसंस्था या लांडगे, कोल्हे, तरस आणि खोकड यांसारख्या लहान शिकारी प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास आहेत. पण कुत्र्यांमधून पसरणारे CDV आणि रेबीजसारखे विषाणू आता या वन्यजीवांपर्यंत पोहोचत आहेत. परिणामी त्यांच्या वर्तनात बदल होत असून मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनाही वाढताना दिसत आहेत कुत्रा लांडगा एकत्री करणातून यातून संकर होण्याच्या घटना वाढतच चालल्या आहेत
आज महाराष्ट्रात पट्टेरी वाघांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. परंतु त्याचवेळी गवताळ परिसंस्थेतील लांडगे, कोल्हे, तरस आणि इतर लहान शिकारी प्राण्यांच्या संवर्धनाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
अधिवास नष्ट होणे, वाढते मानवी अतिक्रमण आणि संसर्गजन्य आजार यांच्या तिहेरी संकटामुळे हे प्राणी आता मानववस्तीजवळ येऊ लागले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय लांडगा हा कायद्याने अत्यंत संरक्षित वन्यप्राण्यांच्या यादीत समाविष्ट आहे. तसेच IUCN च्या धोकाग्रस्त प्रजातींच्या यादीतही त्याचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आपल्या देशात वाघांपेक्षाही कमी संख्येने लांडगे उरले असतानाही आपण त्यांच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहोत.
वन्यजीव संवर्धन म्हणजे केवळ वाघांचे संरक्षण नव्हे, तर संपूर्ण परिसंस्थेचे संतुलन जपणे होय.
आज अत्यंत गरज आहे ती —
- वनक्षेत्रांतील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची
- CDV आणि रेबीजसारख्या संसर्गजन्य आजारांवर सातत्याने निरीक्षण ठेवण्याची
- गवताळ परिसंस्थांना संरक्षण देण्याची
- आणि लहान शिकारी वन्यप्राण्यांनाही समान महत्त्व देण्याची
अन्यथा उद्या खूप उशीर झालेला असेल…
कारण परिसंस्थेचा समतोल ढासळला, तर त्याची किंमत शेवटी माणसालाच मोजावी लागेल. – सौ.गायत्री नचिकेत अवधानी ( मानद वन्यजीव रक्षक,पुणे जिल्हा )
