सामाजिक

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा यात्रेत दर्शनासाठी भाविकांची गर्दी !!

img 20260202 wa0273(1)
img 20260202 wa0346

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या धामणी (ता.आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र श्री म्हाळसाकांत खंडेरायाचे हजारो भाविकांनी रविवार ( दि.०१) दर्शन घेतले.” सदानंदाचा येळकोट, येळकोट-येळकोट जयमल्हार ” असा जयघोष आणि भंडारा खोबर्‍याची उधळण करण्यात आली.खेड,आंबेगांव,जुन्नर पारनेर,सिन्नर, संगमनेर,हवेली.शिरुर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने खंडोबाच्या यात्रेला आले होते.

रविवारी पहाटे मुख्य मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक देवस्थानाचे मानकरी सेवेकरी भगत, तांबे,वाघे मंडळीनी केल्यानंतर स्वयंभू सप्तशिवलिंगावर पंचधातूच्या सर्वांगसुंदर लोभस खंडोबा,म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करुन देवाच्या मुखवट्यांना वस्रालंकार घालण्यात आले.पूर्वमुखी खंडेराय,म्हाळसाई व बाणाईच्या व उत्तरमुखी खंडोबाची बहीण जोगेश्वरीच्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात आले.त्यानंतर देवस्थानाचे सेवेकऱ्यांनी खंडोबाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करुन पारंपारिक पूजा केली त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.पारंपारिक पूजेनंतर देवाचे दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.यावेळी हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

मंदिर व परिसरात आळे पाडळी (ता.पारनेर) येथील थोरात बंधूच्या सौजन्याने आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर व परिसर झळाळून गेला आहे.मंदिराच्या गाभार्‍यात व मंदिराभोवती आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे.भाविकांकडून तळी भंडाराची उधळण करुन नवसपूर्तीचे जागरण गोंधळ घालण्यात येत आहे. यात्रेत घाटातून नवसाचे बैलगाड्यांच्या शर्यत चालू आहे .माही पुनवेच्या यात्रेतील जिलेब,भजी शेव रेवडीची चव वेगळीच असते.

img 20260202 wa0347

मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड व अन्य शहरात नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने बाहेर असलेले चाकरमानी आपल्या कुटुंबासह व मित्रमंडळीसह यात्रेला हजेरी लावून त्यांनी यात्रेचा आनंद लुटला.आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे,पिंपरी चिंचवड,मुंबई,नवी मुंबई या महानगरातील भाविकांनी सकाळपासूनच देवाचे दर्शनासाठी गर्दी केलेली होती.त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता.

मंदिर परिसरात अनेक व्यापार्‍यांनी भंडारा,खोबरे व फुलांची पेढे, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने लावली आहे.धामणी,लोणी,शिरदाळे,पहाडदरा,खडकवाडी,महाळुंगे पडवळ,गावडेवाडी,जारकरवाडी,पाबळ या गावातील ग्रामस्थ व भाविकांनी पारंपारिक वाद्याच्या सुरात व ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूकीने देवास हारतुरे,मांडवडहाळे व नैवेद्य अर्पण केले.धामणीच्या पेठेतून नवसाच्या बगाडाची मिरवणूक काढण्यातआली.आता लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या चाळीस हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभामुळे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सेवा चांगल्या प्रकारे देवस्थानाने उपलब्ध करुन दिलेली आहे.

img 20260202 wa0345

पुणे जिल्ह्यात धामणीच्या खंडोबा देवाचा बैलगाडा शर्यतीचा घाट प्रसिध्द आहे.या घाटातून नवसपूर्तीचे बैलगाडे पळवण्यात येतात.थापलिंग,धामारी,धामणी येथील खंडोबाच्या यात्रेपासून जिल्ह्यातील गावोगावच्या ग्रामदेवतेच्या यात्रेला सुरुवात होते.धामणीच्या खंडोबाच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी (रविवारी) घाटातून नवसाचे बैलगाडे धावले.भाविकांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला.

यात्रेनिमित्त उपविभागीय पोलीस अधिक्षक अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली व पारगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांचे मार्गदर्शनाखाली यात्रेत पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.यात्रेत कोणतीही अनूचित घटना घडू नयेत यासाठी पोलीसांनी दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवलले होते.दोन दिवस यात्रेनिमित्त बंदोबस्त ठेवण्यासाठी पन्नास पोलीस कर्मचारी उपस्थित होते.यात्रेची व्यवस्था देवस्थान,सेवेकरी व ग्रामस्थ व सर्व संस्थाचे पदाधिकारी यात्रा कमेटी व गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहीली,मंदिर व परिसरातील व्यवस्था देवस्थान व सेवेकरी मंडळी आणि धामणी,लोणी,शिरदाळे,पहाडदरा,ज्ञानेश्वर वस्ती येथील ग्रामस्थांनी यात्रेची व्यवस्था पाहतात.आरोग्य विभागाने आरोग्याच्या सुविधा पुरविल्या असून देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाण्याची सेवा उपलब्ध केलेली आहे.

Related posts

रानमळा (ता.आंबेगाव ) येथे श्री धर्मनाथ महाराज यात्रा (बिज) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, निश्चित ध्येय असल्यास यश निश्चित – लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक

Chief Editor

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

Leave a Comment