
पंचनामा प्रतिनिधी – शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या चांडोली बुद्रुक केंद्रातील पाच शाळांमधील १५ शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘जिल्हा शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत केंद्रातील १२७ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आंबेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात आयोजित ‘कॉफी विथ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ’ या कार्यक्रमात अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये चांडोली बुद्रुक केंद्रशाळेच्या केंद्रप्रमुख सीमा सुरेश कहडणे, संगीता सतीश वाव्हळ, सोनाली मारुती पालेकर, दीपा दत्ता गोरडे, अनिल एकनाथ लोंढे; पिंपळगाव तर्फे महाळुंगे शाळेतील मृणाल नंदकिशोर गांजाळे, शशिकांत दत्तात्रय थोरात, धनश्री प्रदीप चासकर, सुनील सोपान वाघ, रोहिणी पांडुरंग लोंढे, अनिता संतोष पोखरकर; थोरांदळे शाळेतील संदीप बबन शिंदे, कमल संतोष थोरात; चांडोली खुर्द शाळेतील साधना दत्तात्रय सांडभोर आणि कळंब शाळेतील सुनीता राजेंद्र चासकर यांचा समावेश आहे.
आंबेगावच्या गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका, शिक्षणविस्तार अधिकारी शैला निमसे आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध मार्गदर्शन केले. या यशाबद्दल चांडोली बुद्रुक केंद्रातील सर्व शिक्षकवृंदांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.


