
पंचनामा प्रतिनिधी खडकवाडी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकवाडी येथील आदर्श शिक्षक श्री. भाऊसाहेब आनंदराव वाळुंज यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्याकडून प्रतिष्ठेच्या ‘आयडॉल टीचर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे खडकवाडी गावासह शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री. वाळुंज यांनी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेत सातत्याने विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. उत्कृष्ट लोकसहभागातून शाळेच्या विकासाला चालना देणे, सीएसआर (CSR) निधीच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर घालणे, अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण यश मिळवून देणे, अशा विविध कार्यांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास! या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती, उपक्रमशीलता, शैक्षणिक कार्याप्रती असलेली निष्ठा आणि समाजाच्या सहकार्याने शाळेचा विकास साधण्याची त्यांची तळमळ यामुळे त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.
या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकवृंद यांच्या वतीने श्री. वाळुंज यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खडकवाडी गावचे माजी आदर्श सरपंच श्री. अनिल शेठ डोके, श्री. बाळासाहेब गेणभाऊ वाळुंज, श्री. ज्ञानेश्वर महाराज सुक्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शेखर आत्माराम सुक्रे, उपाध्यक्ष श्री. अतुल धुमाळ, समितीचे सर्व सदस्य, वैभव शेठ सुक्रे, विशाल शेठ धुमाळ, प्रतीक्षा ताई सुक्रे, निकिताताई शिंदे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकाच्या कार्याचा गौरव म्हणजे संपूर्ण शाळेचा सन्मान! श्री. भाऊसाहेब वाळुंज यांची ‘आयडॉल टीचर’ म्हणून झालेली निवड ही खडकवाडी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण उपलब्धी असून, त्यांच्या कार्यामुळे परिसरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.



