
पंचनामा प्रतिनिधी चांडोली खुर्द : येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या आदर्श शिक्षिका सौ. साधना समीर जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांच्या मार्गदर्शनाखालील पाच विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या उल्लेखनीय यशाची दखल घेत त्यांना ‘कॉफी विथ सीईओ’ या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय आदर्श शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव, अभ्यासातील नियोजन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्यामुळे चांडोली खुर्दच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाबळे, उपाध्यक्ष अतुल इंदोरे, सर्व सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय इंदोरे, शुभांगी ताई इंदोरे, संतोष इंदोरे, मुख्याध्यापक कृष्णराव हुले, सर्व शिक्षकवृंद तसेच चांडोली खुर्द येथील समस्त ग्रामस्थांनी सौ. साधना जाधव यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



