सामाजिक

पंचनामा विचारधान – कशासाठी… पोटासाठी..!!

img 20260530 wa0289
1009645734


लेखन :बाळासाहेब मेदगे
मुक्काम :औदर (राजगुरुनगर)
9004564645

        नुकताच देशातील दुष्काळ जाऊन चार वर्षे झाली होती.दुष्काळात शासनाने रोजगार हमीची कामे काढून देशातील सर्वसामान्य नागरिक वाचवला होता.हळू हळू देशातील परिस्थिती पूर्वपदावर येत होती.परंतु सत्तर टक्के देश दारिद्र्याच्या खाईत लोटला होता.शेती मध्ये आधुनिकता नव्हती. संकरित तो पर्यंत विकसित झाले नव्हते.शेतकऱ्याच्या घरी थोडा फार दुग्ध व्यवसाय चालत होता म्हणून तरी जीवनावश्यक वस्तू बाजारात जाऊन घेता येत होत्या.घरामध्ये खाती तोंड वाढत असल्यामुळे कुटुंब प्रमुखाला तारेवरची कसरत करावी लागत होती.जशी ही स्थिती सगळी कडे होती तशीच आमच्या ही घरी होती.आमच्या घरात आमचे आजोबा कुटुंब प्रमुख होते.

        घरामध्ये दोन बैल दोन म्हशी, एक शेळी,एक

कुत्रे,एक मांजर असा मुक्या जनावरांचा तांडा होता.आम्ही तीन भावंड,आजोबा ,आजी,आई, वडील असा आमचा परिवार आनंदाने तर नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी जीवन जगत होता.घरातील म्हशी व्यान्यासाठी दोन महिने बाकी होते.त्यामुळे घरात दूध हे नावाला सुद्धा पहाण्यास मिळत नव्हते.आणि मग दूध नसले की घरात पैसा आपले तोंड लपवून ठेवत असे.

      वसंत ऋतूच्या आगमनाने रानातील आंब्याची झाडे मोहरली होती.त्यावर्षी आंबे भरपूर होणार हीच भविष्यवाणी वर्तवली जात होती.सामायिक रानात आमची चार आंब्याची झाडं होती.सगळ्या झाडांना आंबे लदडलेले दिसत होते.ही चार ही झाडे भावकी मिळून होती.त्या दिवशी भावकीतील चार चार माणसं त्या थोराड आंब्याखाली जमा झाली होती.तो आंबा पाडाला लागल्याने त्याला उतरवण्याचे काम त्या दिवशी होणार होते. झाडा वर एक माणूस तर खाली एक माणूस अशी जोडी जोडी तयार झाली होती.वर चढणाऱ्या माणसाकडे एक खोडी होती.शेंड्यावरील आंबे  तो त्या खोडीत घेत होता.त्यातील एक एक आंबा खाली असणाऱ्या माणसाकडे झेलण्यासाठी देत होता. पोत्याच्या घडी मध्ये एक एक आंबा उतरवला जात होता.झाडाखाली एक प्रचंड आंब्याची रास लागली होती.सगळ्या भावकीला समान वाटा दिला होता. हे आंबे मोजण्यासाठी आजोबांच्या वयाची तीन माणसं बसली होती. सुरवातीला लाभ असे बोलले जात होते तर नंतर एक एक दोन दोन असे मोठ्याने बोलले जात होते.यामुळे वाटे होत असताना कोणतीही गडबड होत नव्हती. आंबे घरी आणले होते.घरात मोकळ्या जागेत पेंढ्याच्या थरात ते पिकण्यासाठी ठेवले होते.आंबा पिकल्यानंतर खूप गोड लागत होता.साधारण एक आंबा अर्धा किलोच्या आसपास असेल .तो पिकण्यासाठी सहा ते सात दिवस लागले होते.

        सात दिवसानंतर पिकलेले आंबे बाहेर काढले होते. आंब्यांच्या सुवासाने संपूर्ण घर दरवळून गेले होते.इकडे घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्या होत्या. येणाऱ्या बाजाराची वाट पहावी लागली होती. गुळ, घासलेट, कपड्याचा साबण,गोडेतेल , अशा सर्व सामानाची यादी करावी लागली होती.घरात दूध नसल्याने दुधाचा पगार मिळण्याची शक्यता नव्हती.त्या वेळी आजोबांनी आईला आणि मला सांगितले होते. जर ही आंब्याची पाटी तुम्ही बाजारात जाऊन विकली तर गरजेपुरता बाजार येऊ शकतो. तसे पाहिले तर बाजाराचे ठिकाण म्हणजे दोन तास पायी चालत जावे लागत होते. व ते आंबे डोक्यावर घेऊन जावे लागणार होते.आजच्या तारखेला माणसाला रिकामे एवढे अंतर पायी चालता येत नाही तेव्हा ते डोक्यावर सामान घेऊन जावे लागणार होते.

     शनिवारचा दिवस बाजाराचा असल्याने आईने शेण ,पाणी ,लवकर उरकले होते.मी सुद्धा तिच्या बरोबर जाण्यास तयार झालो होतो.माझे त्यावेळी वय साधारण दहा वर्षाचे असेल.आईने एका पाटीत पन्नास साठ आंबे मावतील तेवढे घेतले होते.तर माझ्याकडे पंचवीसेक आंबे एका खताच्या गोनीत भरून दिले होते.अंगात शाळेचा एकच सदरा जो धुवून तोच घालायचा असा आणि ठिगळ लावलेली खाकी चड्डी अशा पेहराव्यात आम्ही दोघे मायलेक निघालो होतो वाड्याच्या बाजाराला.

      बाजाराला जाण्यासाठी काही सासुरवाशीण रस्त्याने जोडीजोडीने चालल्या होत्या त्यापैकी आई ची खास मैत्रीण आईला गप्पा मारण्यासाठी भेटली होती. आईच्या डोक्यावर तीस ते चाळीस किलोचे ओझे होते तर माझ्या कडे खताच्या गोनीत असलेल्या आंब्याचे वजन साधारण दहा एक किलो होते.आई आणि तिची या गावात झालेली मैत्रीण यांच्या संसाराच्या गप्पा रंगात आल्या होत्या.म्हणतात ना प्रवास बोलण्याच्या नादात कधी पूर्ण होतो ते कळत नाही अगदी तसेच होत होते.आईची ती मैत्रीण सासूचे गाऱ्हाणे आईला सांगत होती.पण आई मात्र आमच्या आजी बद्दल काहीच सांगत नव्हती.यांचे हे बोलणे मी मागे राहून ऐकत चाललो खरा परंतु त्या डोक्यावरच्या गोणीने मला चालणे असह्य केले होते.किती ही केले तरे माझे खेळण्याचे ते वय परंतु संसाराचे ओझे वाहण्यासाठी मला तिथे जुंपले होते.मी या खांद्यावरून त्या खांद्यावर ते ओझे रागाने ठेवत होतो.गोनीतले ते निर्जीव आंबे सर्व सहन करत होते. आकाशात ढगांनी उच्छाद मांडला होता.सूर्य देव मध्येच डोके काढत होता.वरून राजा येण्याला काही दिवसांचा अवधी लागणार होता.बाजारातील रस्त्यांमध्ये एक विसाव्याचा आंबा होता.त्याला गर्द सावली होती.बाजाराला आणि बाजार करून आलेला वाटसरू तिथे विसावा घेत होता.असा आम्ही सुद्धा काही काळ विसावा घेतला होता.मग मजल दरमजल करत वाड्याच्या बाजारात पोहचलो होतो.एक रिकामी जागा पाहून आईने बरोबर आणलेली पाटी त्यामधील आंबे पोत्यावर पसरवले होते.माझ्याकडील आंब्याची अवस्था दयनीय झाली होती.पूर्ण ते दबलेले झाले होते.पिवळे धमक आंबे पाहून गिऱ्हाईक येत तर होते पण भाव ऐकून पुढे जात होते.आईच्या लक्षात आले होते ,भाव थोडा जास्तच आपण सांगत आहोत. मग काही वेळाने थोडा भाव कमी केला तर काही क्षणात आईची पाटी पूर्ण विकली गेली होती.माझ्या कडील आंबे मात्र पाहून गिऱ्हाईक पुढे निघून जात होते.आई मला बडबड करत होती.तू जर बरोबर ओझे एकसारखे डोक्यावर आणले असते तर ते सुद्धा माझ्या सारखे विकले गेले असते.माझी चूक मला कळली होती.आई बोलत असताना मी काही वेळा रडत होतो.परंतु माझे दुःख मी आईला सांगू शकत नव्हतो.नंतर इकडचे तिकडचे करत आईने ते आंबे अर्ध्या भावात विकले होते.

       आम्ही दोघे ही मायलेक भुकेलो होतो.आमच्या कडे घरचा सगळा बाजार येईल एवढे पैसे आले होते. बरोबर आम्ही घरातून भाकरी आणली होती.अहमद शेठच्या हॉटेल मध्ये भुकेच्या भरात चार भाकरी मिसळी बरोबर कुठे गेल्या माहितीच पडल्या नव्हत्या. मग आईने चिमण भाईच्या दुकानात जाऊन सगळा बाजार केला होता.आणि तो बाजार आम्ही आल्या रस्त्याने परत गावाला नेला होता.टिचभर पोटासाठी आपण आयुष्यात आज किती मेहनत केली पण त्याहीपेक्षा घरातील सगळीच माणसं रात्रदिवस अपार कष्टातून आपल्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने फुलवत असतात याची मला कल्पना आली होती.
fb img 1774661449199

Related posts

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल अबॅकस स्पर्धेत दैदिप्यमान यश!!

Chief Editor

पारगाव (दत्तात्रयनगर) येथील गट क्रमांक ३५४ मध्ये भारतीय जनगणनेला सुरुवात !!

Chief Editor

लोणी (धामणी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला बाल आनंद मेळावा !!

Chief Editor

Leave a Comment