सामाजिक

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यात ‘जनसेवा सप्ताह’ उत्साहात साजरा होणार; विविध सामाजिक व आरोग्य उपक्रमांचे आयोजन

img 20260721 wa0558

मंचर : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने २२ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. शरद सहकारी बँक लि. मंचर, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. पारगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर आणि आंबेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ लि. मंचर यांच्या सौजन्याने या सप्ताहात विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक कार्यक्रमांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

सप्ताहाची सुरुवात बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शरदचंद्रजी पवार सभागृह येथे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती कार्यक्रमाने व अभिवादनाने होईल. यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २३ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर व उपबाजार लोणी, चांडोली खुर्द, भागडी व लाखणगाव गायरान परिसरातही वृक्षारोपण केले जाईल.

आरोग्यविषयक उपक्रमांतर्गत २३ जुलै ते २७ जुलै दरम्यान मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ग्रामीण रुग्णालय तळेघर, श्री भैरवनाथ-माता जोगेश्वरी सभागृह शिंगवे, श्री वाकेश्वर मंदिर सभागृह पेठ, ग्रामीण रुग्णालय घोडेगाव आणि श्रीराम सभागृह नांदूर येथे (उपजिल्हा रुग्णालय मंचर व बुधावाणी हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने) पार पडणार आहे. शनिवार, दि. २५ जुलै रोजी स्व. अजितदादा पवार जयंती व धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथे अन्न छत्रालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिवगिरी मंगल कार्यालय, मंचर येथे ‘महिला सक्षमकरण’ विषयक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक मा. संजय आवटे यांचे व्याख्यान होणार असून, याप्रसंगी स्व. अजितदादा पवार महिला उद्योजिका पुरस्कार, स्व. अजितदादा पवार आदर्श खेळाडू पुरस्कार आणि प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी (महिला व पुरुष) स्व. अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार प्रदान केले जातील.

सोमवार, दि. २७ जुलै रोजी ‘युवा संकल्प शिबिर’ आणि आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘हस्ताक्षर सुधार पुस्तिका वाटप’ कार्यक्रम तसेच श्रीक्षेत्र भिमाशंकर परिसर येथे ‘सार्वजनिक स्वच्छता मोहीम’ राबवली जाणार आहे.

याशिवाय, दि. २७ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित उसाच्या भरघोस उत्पादनासाठी ‘ऊस विकास कार्यशाळा व शेतकरी समुपदेशन मेळावे’ पार पडणार आहेत. हे मेळावे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (निरगुडसर), सोसायटी हॉल (खडकी), ज्येष्ठ नागरिक संघ हॉल (कळंब), श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (वळती), घोडेगाव आणि श्री भैरवनाथ मंदिरासमोरील हॉल (शिंगवे-पारगाव) येथे आयोजित करण्यात आले आहेत.

या सर्व जनहितार्थ व सामाजिक उपक्रमांचा नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

1009850407

Related posts

मटण जेवल्यावर दही खाणे बेतले जीवावर; वृद्ध महिलेचा मृत्यू, पतीची प्रकृती चिंताजनक !!

Chief Editor

मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या जप्त वाहनांचा २१ ऑगस्टला जाहीर ई-लिलाव !!

Chief Editor

कनेरसर–पाबळ रस्ता मृत्यूचा सापळा; दोन वर्षांपासून दुर्लक्ष, नागरिकांचा संताप !!

Chief Editor

Leave a Comment