सामाजिक

लोणीतील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; तहसीलदारांच्या पत्रानंतरही अधिकारी भेटले नसल्याचा आरोप

1011221040

1011221026

पंचनामा प्रतिनिधी लोणी, ता.आंबेगाव : लोणी गावातील बेकायदेशीर खडी क्रशर बंद करावेत, बेकायदा उत्खननप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे धुळीमुळे होत असलेले नुकसान थांबवावे, या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण बुधवारी (दि. ७) तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. प्रशासनाकडून कारवाई सुरू असल्याचे सांगणारे पत्र प्राप्त झाले असले, तरी प्रत्यक्षात अद्याप कोणताही संबंधित अधिकारी उपोषणस्थळी भेटण्यासाठी आलेला नाही, असा आरोप उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
तहसीलदारांकडून पत्र; ‘प्रशासकीय स्तरावर कारवाई सुरू’
आंबेगावचे तहसीलदार राहुल सारंग यांनी दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी उपोषणकर्त्यांना पत्र दिले आहे. या पत्रात, लोणी गावातील मागण्यांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयांकडून अहवाल व रिपोर्ट मागविण्यात आले असून, प्रशासकीय स्तरावर योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच उपोषण व आरोग्याबाबत प्रशासन संवेदनशील असून, कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने सुरू असलेले आमरण उपोषण त्वरित मागे घ्यावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
मात्र, केवळ पत्र देऊन कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे; प्रत्यक्षात उपोषणस्थळी संबंधित अधिकारी भेटण्यासाठी आलेले नाहीत, असा दावा उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
‘कारवाई कधी होणार, हे लेखी द्या’
प्रशासनाने कारवाई सुरू असल्याचे सांगण्यापेक्षा नेमकी कोणती कारवाई करण्यात येणार, कोणत्या मागण्यांवर काय निर्णय घेण्यात आला आहे आणि कारवाई कधीपर्यंत केली जाणार, याबाबत स्पष्ट लेखी स्वरूपातील आश्वासन द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तसेच आपल्या मागण्यांबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी आणि मागण्यांवर ठोस निर्णय व कारवाईची लेखी हमी द्यावी, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. जोपर्यंत लेखी स्वरूपात ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बेकायदेशीर क्रशर, उत्खननाविरोधात चार वर्षांपासून पाठपुरावा
लोणी येथील शेतकऱ्यांचा हा लढा २०२२ पासून सुरू असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. बेकायदेशीर खडी क्रशर, बेकायदा उत्खनन तसेच धुळीमुळे शेतीचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी विविध शासकीय कार्यालयांकडे करण्यात आल्या आहेत. तक्रारींसोबत छायाचित्रे तसेच संबंधित कागदपत्रे आणि पुरावे सादर करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
याप्रकरणी बेकायदेशीर खडी क्रशर तातडीने बंद करणे, बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, कथित बोगस ग्रामपंचायत ठरावाच्या आधारे मिळविलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने रद्द करण्याबाबत कार्यवाही करणे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व कारवाई करणे, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
पाच शेतकरी आमरण उपोषणावर
ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आमरण उपोषणात सुखदेव आढाव, सखूबाई आढाव, विकास आढाव, धनश्री आढाव आणि गुलाब गायकवाड हे बाधित शेतकरी सहभागी आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरपंच डॉ. सावळेराम नाईक व उपसरपंच राजेंद्र वाळुंज आणि समस्त लोणी ग्रामस्त आंदोलनस्थळी उपस्थित राहिल्याचे सांगण्यात आलेले असून या आंदोलनाला लोणी ग्रामपंचायत चा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले.
“प्रशासनाकडून कारवाई सुरू असल्याचे पत्र मिळाले आहे; मात्र प्रत्यक्षात अधिकारी भेटण्यासाठी आलेले नाहीत. आम्हाला केवळ आश्वासन नको, तर आमच्या मागण्यांवर काय कारवाई होणार आणि ती कधी होणार, याचे लेखी स्वरूपातील स्पष्ट आश्वासन हवे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन चर्चा करून लेखी निर्णय दिल्यानंतरच उपोषण मागे घेण्याबाबत विचार केला जाईल,” अशी भूमिका उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आता प्रशासन संबंधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणती ठोस कार्यवाही करते आणि उपोषणाबाबत पुढील तोडगा काढण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष भेट देतात का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

1011111248

Related posts

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार

Chief Editor

राजुरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्यंगिरा चंडीपाठाचे आयोजन !!

Chief Editor

उन्हाळ्याची चाहूल लागताच माठांची मागणी वाढली; ‘गरीबांचा फ्रीज’ पुन्हा घराघरांत पोहचणार !!

Chief Editor

Leave a Comment