
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथील कॉम्प्युटर विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘युक्ती 2.0’ स्टार्टअप आयडियाथॉनला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल ७६ संघांनी सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांच्या नवकल्पकता, तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोन आणि उद्योजकीय क्षमतेचे दर्शन घडविले.
विद्यार्थ्यांच्या अभिनव संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील उद्योजकीय कौशल्यांना चालना देणे तसेच सामाजिक व औद्योगिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. प्रत्येक संघात १ ते ४ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान विभागाचे सह-अधिष्ठाता डॉ. पंडित शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे व प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर उपस्थित होते. स्वप्नील पवार, स्वप्नील फुलसुंदर आणि जयेश नायर यांनी परीक्षक म्हणून काम पाहत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पंडित शेळके म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना हीच भविष्यातील उद्योगांची बीजे आहेत. केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. अशा स्टार्टअप आयडियाथॉ मधून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची आणि त्यातून समाजोपयोगी व्यवसाय उभा करण्याची संधी मिळते.”
वल्लभ शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि कल्पकतेची सांगड घालून विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधले पाहिजेत. अपयशाला घाबरू नका; प्रत्येक प्रयोगातून मिळणारा अनुभव ही यशाकडे जाणारी महत्त्वाची पायरी आहे.”
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण, कल्पक आणि भविष्यवेधी स्टार्टअप संकल्पना सादर केल्या. समस्या निराकरणाची क्षमता, नाविन्यता, व्यवहार्यता आणि प्रभावी सादरीकरण या विविध निकषांच्या आधारे संकल्पनांचे परीक्षण करण्यात आले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम क्रमांकास ₹३,००० रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ₹२,००० व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास ₹१,००० व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
‘युक्ती 2.0’ ही केवळ स्पर्धा न ठरता विद्यार्थ्यांच्या “कल्पनेपासून कृतीकडे आणि कृतीपासून स्टार्टअपकडे” घेऊन जाणारा प्रेरणादायी प्रवास ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्टार्टअप क्षेत्रातील संधी, व्यवसायाच्या मूलभूत संकल्पना आणि नवकल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्याची दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा. स्नेहा शेगर यांच्यासह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना पंख देणारा, उद्योजकतेची नवी उमेद निर्माण करणारा आणि भविष्यातील उद्योजक घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरलेला हा उपक्रम महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील उल्लेखनीय टप्पा ठरला.



