
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव : माळीन फाटा ते असाणे या प्रमुख मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने तसेच चिखल साचल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
माळीन फाटा ते असाणे या रस्त्याच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काही महिन्यांपूर्वी जुना रस्ता उखडला. मात्र, त्यानंतर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आल्याने पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र, महिनाभरातच पुन्हा खड्डे पडल्याने नागरिकांनी या कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत असून, अपघाताची भीती नागरिकांना वाटत आहे. या मार्गाचा वापर करणारे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, कामगार तसेच रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या समस्येबाबत असाणे गावचे सरपंच खेमा सोनू गभाले, जनकल्याण सेवा प्रतिष्ठान असाणेचे संस्थापक-अध्यक्ष सुरज ढवळे, आदिवासी क्रांती संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख दत्ता ढवळे तसेच शिवसेना नेते विशाल मोरे यांनी संबंधित ठेकेदाराशी वेळोवेळी संपर्क साधून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून ‘काम लवकर सुरू करू,’ असे आश्वासन मिळत असले तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
खड्डे बुजवून काम सुरू करण्याची मागणी
“माळीन फाटा ते असाणे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे दररोज प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. सायंकाळच्या वेळी तर या रस्त्यावरून वाहन चालविणेही अशक्य होते. प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून रस्त्याचे कायमस्वरूपी काम तातडीने पूर्ण करावे,” अशी मागणी जनकल्याण सेवा प्रतिष्ठान असाणेचे संस्थापक-अध्यक्ष सुरज ढवळे व जनकल्याण सेवा प्रतिष्ठान सर्व सदस्य यांनी केली.

दररोजच्या प्रवासाचा त्रास
“याबाबत कृष्णा यशवंत भालचिम यांनी सांगितले की मी, माध्यमिक विद्यालयात कामासाठी असाणे ते माळीन असा दररोज प्रवास करतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज मोठा त्रास सहन करावा लागतो. सायंकाळच्या वेळी वाहन चालविताना अपघाताची भीती वाटते. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून कायमस्वरूपी रस्त्याचे काम मार्गी लावावे,” अशी मागणी असाणे ग्रामस्थ सचिन गभाले यांनी केली.



