
पंचनामा प्रतिनिधी – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी सोहळ्यातील दुसऱ्या पर्वात हिंगोली येथील ह.भ.प. सोपान महाराज सानप यांच्या कीर्तनरूपी सेवेने भाविकांना भक्तिरसात चिंब केले. भक्तिभाव, नामयज्ञ, संत-सज्जनांची मांदियाळी, सांप्रदायिक वातावरण आणि आकर्षक रोषणाईने नटलेली धामणी आज अक्षरशः अयोध्या नगरी झाली आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख सानप महाराजांनी आपल्या कीर्तनातून केला.
धामणी येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर, त्याचा गौरवशाली इतिहास आणि सध्या सुरू असलेला शताब्दी महोत्सव सोहळा पाहून आपण प्रभावित झालो असल्याचे सानप महाराजांनी सांगितले. यावेळी त्यांनी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे तसेच त्यांच्यानंतर विष्णू महाराज केंद्रे यांनी धामणी गावाशी जोडलेली सांप्रदायिक नाळ याचाही आवर्जून उल्लेख केला.
सानप महाराजांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून अत्यंत सहज, सोप्या आणि संवादी भाषेत भक्ती, संस्कार आणि संतविचारांची उकल केली. त्यांची स्वच्छ, स्पष्ट, सुंदर आणि मधाळ वाणी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. त्यांच्या कीर्तनातील संवादात्मक शैलीमुळे उपस्थित भाविकही कीर्तनाशी एकरूप झाल्याचे चित्र दिसून आले.
सानप महाराजांचा शिक्षणाचा प्रवास हिंगोली, आळंदी, मानवत ते वृंदावन असा झाला आहे. या प्रवासातील प्रत्येक टप्प्याने आपल्याला अधिक समृद्ध केले असून, हीच समृद्धी आपल्या कीर्तनसेवेतून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध भागांतील मायबोली आणि सांस्कृतिक संस्कारांचा प्रभाव त्यांच्या कीर्तनातून जाणवत होता.

“दृष्टी बदलता येते; पण दृष्टिकोन बदलता येत नाही,” या विचारातून त्यांनी मानवी मनाचा स्वभाव आणि मनाचा वेग यांचे अत्यंत चपखल वर्णन केले. विविध अभंगांचा आधार घेत त्यांनी हा विषय उपस्थित जनसागराच्या मनावर प्रभावीपणे बिंबविला. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगांचे मार्मिक विवेचन करत त्यांनी भक्तिरसाची अनोखी अनुभूती दिली.
‘माय’, ‘माता’, ‘माऊली’, ‘प्रेम’ आणि ‘संस्कार’ या शब्दांमागील भावविश्व सानप महाराजांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडून दाखविले. प्रत्येक शब्दातील अर्थाचे विविध पदर त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उलगडल्याने उपस्थित भाविक भारावून गेले.
धामणी येथील अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सवाचे पर्व दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ आणि भक्तिमय होत आहे. भक्तिरसाच्या या वर्षावात चिंब होण्यासाठी मोठा जनसागर लोटत असून, दिवसेंदिवस सोहळ्याची भव्यता वाढत आहे. शताब्दी सोहळ्याचे सुयोग्य नियोजन आणि अन्नप्रसाद व्यवस्थेचा अनोखा संगम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
भक्ती, श्रद्धा, संस्कार आणि सांप्रदायिक परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी धामणी नगरीत भाविकांचा ओघ कायम असून, शताब्दी सोहळा एका ऐतिहासिक आणि संस्मरणीय पर्वाकडे वाटचाल करीत आहे.



