सामाजिक

कनेरसर–पाबळ रस्ता मृत्यूचा सापळा; दोन वर्षांपासून दुर्लक्ष, नागरिकांचा संताप !!

img 20260704 wa0769
1010054634

पंचनामा प्रतिनिधी – कनेरसर ते पाबळ या सुमारे ६ ते ७ किलोमीटरच्या मुख्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

कनेरसर एमआयडीसीमध्ये ये-जा करणारे कर्मचारी, कामगार आणि वाहनचालकांना दररोज या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास खड्डे न दिसल्याने अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची वास्तविक स्थिती लक्षात येत नाही आणि वाहने थेट खड्ड्यांमध्ये जाऊन अपघात होत आहेत. त्यामुळे अनेक नागरिक जखमी होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली होती. मात्र, आंदोलने करूनही नागरिकांना न्याय मिळालेला नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी मंजूर झाल्याची चर्चा असली तरी आजपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. तसेच या विलंबाबाबत कोणतीही प्रभावी चौकशी झालेली नसल्याची बाबही समोर येत आहे.
यापूर्वी आंदोलनानंतर प्रशासनाने केवळ खड्डे बुजवण्याचे काम केले होते. मात्र त्यानंतर डांबरीकरण न झाल्याने काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडले. त्यानंतर पाबळ, पूर आणि कनेरसर येथील नागरिकांनी पुन्हा आंदोलन केले. दुसऱ्यांदा देखील केवळ खड्डे बुजवून नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. डांबरीकरण न झाल्यामुळे आज पुन्हा रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.”अजून किती लोकांचा जीव गेल्यावर हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त होणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

या बातमीच्या माध्यमातून पाबळ व कनेरसर परिसरातील नागरिकांनी आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

कनेरसर एमआयडीसीकडे जाणारा हा अत्यंत वर्दळीचा मुख्य मार्ग असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. वारंवार आंदोलने करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून ते हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

1009850407

Related posts

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट खलनायक श्री. संभाजीराव कोल्हे

Chief Editor

जिज्ञासा लोकसंचलीत साधन केंद्र मंचर तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !!

Chief Editor

श्रीराम मंदिर द्वारकाधीश आश्रमात अकरा फुटी ध्यानस्थ महादेव मूर्तीचे भव्य अनावरण; संत-महंत, मान्यवरांसह हजारो भाविकांची उपस्थिती !!

Chief Editor

Leave a Comment